मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनावर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. संघटनेचे नारायण गौडा हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला असून महाराष्ट्राविरोधात कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको करून रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात (Government of Maharashtra) घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे.