Maharashtra LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीने 17 जागा जिंकल्या असून, याऊलट महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत. भाजपाच्या अपय़शानंतर आता पक्षाचे नेते आरसा दाखवत आहेत. भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी असंही मोहित कंबोज म्हणाले आहेत.
मोहित कंबोज यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, "भाजपा महाराष्ट्र आणि भाजपा मुंबईने रिअॅलिटी चेक करण्याची गरज आहे. या पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? फक्त एका व्यक्तीची लाईन छोटी करण्याच्या नादात पक्षाचं नुकसान केलं. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी".
BJP Maharashtra & BJP Mumbai need to have reality check !
Who is going to take responsibility of this defeat ?सिर्फ़ एक आदमी की लाइन छोटी करने के चकर में पार्टी का नुक़सान किया !
Maharashtra Senior leaders , Ministers accountability to be done !@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 5, 2024
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत आपल्याला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केली आहे. "जागा कमी आल्यात हे तथ्य आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी भाजपाकडे अजून विनंती करणार आहे. भाजपामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो. मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल,. ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझा पूर्ण वेळ देता येईल," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
'जो बुंद से गयी वो हौद से नहीं आएगी' अशी हिंदीत म्हण आहे असा टोला सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तसंच कारवाई होण्याची शक्यता असल्याने त्यांनी सन्मानपूर्वक बाहेर जाण्याची मागणी केली असावी असंही त्या म्हणाल्या आहेत. "अत्यंत वाईट प्रदर्शन झाल्याने कारवाई होऊ शकते. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते, प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं यावरही चर्चा झाली असावी. हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली तर तो मोठा धक्का असेल. त्यापूर्वी त्यांना आदरपूर्वकपणे बाहेर जाण्याची परवानगी मागावी या आशेने त्यांनी ही मागणी केली असावी," असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे कदाचित मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात. देवेंद्र फडणवीस चेहरा असणार नाहीत असा मोठा दावाही त्यांनी केला आहे.