मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्री झाली आहे. शिवसेनेत दुफळी निर्माण करत वेगळ्या झालेल्या एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका दाखल केल्या. (Maharashtra Political Crisis eknath shinde shivsena supreme court)
सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. 16 आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
गटनेता म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या नरहरी झिरवळांच्या निर्णयाविरोधात स्वतः शिंदे यांनी याचिका दाखल केलीये. सुप्रीम कोर्टाने तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती मान्य केली असून यावर दोन्ही याचिकांवर आज एकाच वेळी सुनावणी होईल.
शिंदेंची बाजू ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे मांडतील तर महाविकास आघाडीच्या बाजूनं कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे युक्तिवाद करतील. परिणामी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचल्यामुळं आता पुढे त्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवनेसेतून बंडखोरी करत बागेर पडलेल्या नव्या गटाचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.