"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Jul 2, 2023, 05:58 PM IST
"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया title=

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) पाठिंबा दिला आहे. विरोधकांकडून आता अजित पवार यांच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसनेही (Congress) याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपने (BJP) तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भाजप तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.  

"भाजपचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्येही भाजपचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात व केंद्रातही परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा दिसत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याचे दिसत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. ईडी सरकार बहुमताचा दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण आमागी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नव्हता त्याच मानसिकतेतून हा सत्तापिपासू उद्योग केला आहे," असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आता तोंडाने राष्ट्रवादीच्या गटासोबत बसले

उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याच्या वल्गनाही ते करत असतात. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता भाजप, नरेंद्र मोदी व फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत, याचे उत्तरही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे लागणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार 

"कोण-कोणाबरोबर सत्तेसाठी घरोबा करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसत आहे. जनतेला हे फोडाफोडीचे राजकारण अजिबात आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने जाण्याने काँग्रेस आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही उलट काँग्रेस पक्ष जास्त ताकदीने व जनतेच्या विश्वासावर मोठ्या बहुमताने निवडून येईल. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तसेच केंद्रातही सरकार सत्तेत येईल," असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.