मुंबई : नुसतं सोशल मीडिया उघडलं की एकच वाक्य सध्या सगळीकडे एकाच वाक्याचा धुमाकूळ आहे. काय झाडी... काय डोंगर... काय हॉटेल....सगळं ओक्के या वाक्यावर तुफान मीम्स सध्या फिरत आहेत. हे वाक्य बंडखोर आमदार शहाजीबापू यांनी एका कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना वापरलं होतं. त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.
महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरालं आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे 25 हून अधिक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. हे सगळे आमदार शिंदेसोबत गुवाहाटीला आहेत. यामध्ये आमदार शहाजीबापू पाटील देखील आहेत.
शहाजीबापू पाटील यांचं कार्यकर्त्यांसोबत झालेलं संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आहेत. तिथून शिवसेनेकडून निवडणूक लढवून ते जिंकले. ते ग्रामीण मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यांनी न राहून त्यांच्या कार्यकर्त्याशी फोनवर आपल्या मनातील खंत व्यक्त केली. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक मीम्स व्हायरल झाले. चर्चांना उधाण आलं.
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी असताना ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी व्हायचे. त्यानंतर पुढे ते राजकारणात सक्रिय झाले. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत युवा काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली. सांगोला विधानसभा मतदारसंघाकडून त्यांना यासाठी उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही.
पुढे त्यांनी 1995 रोजी गणपतराव देशमुख यांचा पराभव करून विधानसभेत आपली जागा मिळवली. त्यानंतर सलग तीनवेळा निवडणुका लढवूनही त्यांना जिंकून येता आलं नाही. सुरुवातीला काँग्रेसमधून लढणारे शहाजीबापू नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. सलग 4 पराभवानंतर ते 2019 मध्ये शिवसेनेमधून त्यांनी निवडणूक लढवली. 2019 मध्ये 674 मतांनी त्यांना विजय मिळाला. हा विजय त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीतला सगळ्यात मोठा विजय आहे.