Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar : साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर झाले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवे होते असे म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: May 12, 2023, 11:12 AM IST
Ajit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं title=

Ajit Pawar Angry on Sushma Andhare : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बोलताना यांच्यासमोर बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) बोलताना भावनिक झाल्या होत्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी तक्रार करताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते. माझ्याविरोधात अश्लाघ्य बोललं गेलं त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात बोलायला हवं होतं, असं म्हणत सुषमा अंधारे शरद पवार यांच्यासमोर भावूक झाल्या. याबाबत बोलताना अजित पवार यांनी तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) रडायला हवं होतं असे सुनावलं आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या. इथे राजकारणाचा विषय नाही. अश्लाघ्य पद्धतीने जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होतं सर, सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तक्रार का लिहून घेतली नाही? खरे की खोटं? पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे. तरीसुद्धा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता, असं म्हणत सुषमा अंधारे भावनिक झाल्या.

"माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. आता जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते शिंदे गटाचे आहेत, जे बायकांबद्दल इतका हिणकस दृष्टीकोन बाळगतात, इतक्या अश्लाघ्य पद्धतीने बोलतात. या सगळ्या लोकांना ज्यांच्यामध्ये प्रचंड मनुवादी दृष्टीकोन वाढलेला आहे. यांना सत्तेवरुन खाली खेचायचं असेल तर महाविकास आघाडी असायला हवं. महाविकास आघाडी असेल तर तुम्ही असायला हवं. तुम्ही आहात तर ती मोट बांधून आहे, म्हणून तुम्ही असायला हवं," असे सुषमा अंधारे शरद पवार यांना उद्देषून म्हणाल्या.

अजित पवार संतापले...

"सुषमा अंधारे ठाकरे गटात आहेत. अंबादास दानवे यांच्याकडे विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते पद आहे. शरद पवार यांच्यासमोर रडण्यापेक्षा सुषमा अंधारे ज्या पक्षाकरता बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत त्यांनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे सांगितले पाहिजे. जेवढा विधानसभेच्या विरोधी पक्षाला अधिकार आहे तेवढाच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याला आहे. त्यांना आपल्यामार्फत सांगा की, तिथं रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंसमोर प्रश्न उपस्थित केला असता तर जास्त योग्य झालं असतं," असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.