Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी स्वीय सचिव बालाजी पाटील खतगावकर (Balaji Patil Khatgaonkar) यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नांदेडमधल्या मुखेड मतदार संघाची (Mukhed Vidhansabha Constituency) जागा भाजप लढवणार आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार तुषार राठोड (Tushar Rathod) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघातून बालाजी पाटील खतगावकर इच्छूक होते, पण ही जागा भाजपाच्या वाट्याला गेल्याने बालाजी पाटील खतगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी बालाजी पाटील खतगावकर यांनी खासगी सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. समर्थकांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केलीय.
मुखेड विधानसभेच्या रिंगणात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (CM Ekanth Shinde) खासगी स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए असलेले बालाजी खतगावकर मुखेड विधानसभेत ते आपलं नशीब आजमवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बालाजी खतगावकरांनी मुखेड विधानसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवलाय. गाड्यांच्या ताफ्यासह महापरिवर्तन रॅली काढत बालाजी खतगावकरांनी जोरदार शक्तीप्रदर्शनसुद्धा केलं. बालाजी खतगावकरांच्या रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जेसीबीने फुलं उधळून बालाजी खतगावकरांचं भव्य स्वागतही करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आमदार होणारच असा विश्वास बालाजी खतगावकरांनी बोलून दाखवलाय. बालाजी खतगावकरांनी यावेळी आमदार अभिमन्यू पवारांचा उल्लेख केलाय ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी ठरले होते. तेव्हा अभिमन्यू पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सचिव होते. फडणवीसांनी त्यांना औसा मतदारसंघातून उतरवलं होतं. त्यासाठी आधी तयारीसुद्धा करुन घेतली होती.
मुखेडमध्ये गेल्या दोन टर्मपासून भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड आहेत... आणि याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पीए बालाजी खतगावकरसुद्धा लढण्यासाठी तयारी करत आहेत. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना याचीही चर्चा आता सुरु झालीय..