'स्टेजवर शरद पवारांच्या मागून का गेलात?' अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar On Sharad Pawar: शरद पवार आणि अजित पवार हे यावेळी एकाच स्टेजवर आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद न साधता मागून जाणे पसंत केले. यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 1, 2023, 06:16 PM IST
'स्टेजवर शरद पवारांच्या मागून का गेलात?' अजित पवारांनी स्पष्टच सांगितले title=

Ajit Pawar On Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्या टिळक पुरस्काराना सन्मान करण्यात आला. लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पीएम मोदी यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने पीएम मोदी पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान शरद पवार आणि अजित पवार हे यावेळी एकाच स्टेजवर आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद न साधता मागून जाणे पसंत केले. यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्यात आला तेव्हा स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी स्टेजवर सर्व महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पण अजित पवार हे शरद पवारांची भेट टाळताना दिसले. त्यांनी शरद पवार यांच्या मागच्या बाजून बाहेर पडणे पसंत केले. हे कॅमेराच्या नजरेतून सुटले नाही.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही शरद पवार यांच्या मागून का निघून गेलात? स्टेजवर त्यांच्याशी संवाद का साधला नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी मी शरद पवारांचा आदर करतो. म्हणून मागून निघून गेलो असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. 

भिडेंची वक्तव्य खपवून घेणार नाहीत. बेताल वक्तव्यांप्रकरणी पोलीस भिडेंवर योग्य कारवाई करतील, असे अजित पवार म्हणाले. 

पंतप्रधानांशी पुणे-नाशिक रेल्वेबद्दल बोलणं झालं. राज्यातले प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातल्या प्रश्नांसाठी दिल्लीत जावंच लागत, असे त्यांनी सांगितले.

मणिपुरातील दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

इंदिरांजीप्रमाणेच मोदींची लोकप्रियता आहे. मोदींच्या नेतृत्वात सध्या वेगाने काम सुरु, पंतप्रधान मोदी 18-18 तास काम करतात.मोदींसारख लोकप्रिय व्यक्तीमत्व कोणी नाही, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं.