चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी भरसभेत इशारा दिला आहे. तू आमदार कुणामुळे झाला, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही असा इशारा शरद पवार यांनी सुनील शेळके यांना दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात असेही शरद पवार म्हणाले. लो ते बोलत होते. त्यामुळे आता मावळमधील राजकारण तापलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
"तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला इथं कोण आलं होत? त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष कोण होतं? तुमच्या फॉर्मवर माझी सही आहे. माझ्या सहीने तुम्ही निवडूण आलात आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे एकदा दमदाटी केलीत बस्स. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. पण त्या रस्त्याने जाण्याची स्थिती तुम्ही निर्माण केली तर सोडतही नाही," असा इशारा शरद पवार यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळकेंना दिला.
भाजप एक वॉशिंग झालंय - शरद पवार
यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. " भाजप म्हणजे आज एक वॉशिंग मशीन झाले आहे. भाजपात या आणि स्वच्छ नेते बना. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतायेत. त्यात मोदींची गॅरंटी देतायेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहिराती दिली जातेय. जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देतायेत. आज हे सांगतात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. ज्या वेळेस मी मंत्रिपदाची शपथ घेतली पहिली फाईल आली ती होती गहू आयातीची. मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो. आपला कृषी प्रधान देश आहे आणि आपण गहू आयात करतो. पण गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली," असेही शरद पवार म्हणाले.