'यांना कोणीतरी जेलमध्ये टाका' चिकन टीक्का चॉकलेटचा Video पाहून नेटकऱ्यांची भूक कुठच्याकुठे पळाली

Bizarre Food Viral Video: हे विचित्रच्याही पलिकडलं.... म्हणजे ही माणसं असं काहीतरी कसं करू शकतात? व्हिडीओ पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.   

सायली पाटील | Updated: Dec 16, 2024, 02:24 PM IST
'यांना कोणीतरी जेलमध्ये टाका' चिकन टीक्का चॉकलेटचा Video पाहून नेटकऱ्यांची भूक कुठच्याकुठे पळाली  title=
Viral Video Man Making Bizarre Chicken Tikka Chocolate Internet users left in In Shock

Bizarre Food Viral Video: आवडीचा पदार्थ डोळ्यांसमोर आला की अनेक खवैय्यांच्या चेहऱ्यावरील भाव एका क्षणात बदलतात. ही मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अनेकदा बरेच प्रयोगही करताना दिसतात. देशोदेशीची खाद्यभ्रमंती असो किंवा मग रस्त्यावर मिळणारे कमाल चवीचे खाद्यपदार्थ. खाण्याचा विषय जिथंजिथं येतो तिथंतिथं अनेकांचाच चेहरा खुलतो. पण, सध्या मात्र हाच विषय अनेकांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आणण्याचं काम करत आहे. 

निमित्त ठरतंय ते म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ. हल्ली Street Food मध्ये बरेच नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला जात असताना अशाच एका प्रयोगाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या डोक्याला झिणझिण्या आणत आहे. या व्हिडीओमधील दृश्य खऱ्या अर्थानं मन विचलित करणारी आहेत, कारण इथं पाहायला मिळतंय चिकन टीक्का चॉकलेट. 

Singh Laly Official नावाच्या एका युजरनं इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुळच्या पंजाबच्या असणाऱ्या आणि सध्या जर्मनीमध्ये एका रेस्तराँची मालकी सांभाळणाऱ्या या युजरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तो चॉकलेट बनवतोय हे लक्षात येतं. व्हिडीओ पुढे जातो आणि चॉकलेटच्या मोल्डमध्ये हा माणूस चक्क चिकन टीक्का हा पदार्थ टाकताना दिसतो. 

हेसुद्धा वाचा : दोघांची एकत्रित संपत्ती 2500 कोटी रुपये... हे आहे मनोरंजन क्षेत्रातील सर्वात श्रीमंत जोडपं; खान, बच्चन, कपूर सर्वांना टाकलं मागे 

काहीतरी वेगळं करण्याच्या नादात या माणसानं Dubai's Schokolade Chicken Tikka Masala असं नाव दिलं असून, त्याचा हा अतरंगीपणा पाहून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. 'हा बरा आहे ना....?' असा उपरोधिक प्रश्न कोणी केला, तर कोणी या कल्पनेनंच 'कसंतरी होतंय...' अशी प्रतिक्रिया दिली. चिकन, चॉकलेट, गोड, तिखट... साऱ्या चवींची मिसळ.... हा पदार्थ आहे की आणखी काय? हेच अनेकांना कळेना. 

या कामासाठी तुम्हाला कारागृहात पाठवलं पाहिजे... असं म्हणतही काही नेटकऱ्यांनी घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. मुळात अनेकदा काहीतरी नवं करण्याच्या नादात काही मंडळी असे प्रयोग करतात जे कल्पनाशक्तीला शह देऊन जातात ज्याची अनेकदा गरज नसते. तुम्ही कधी असं विचित्र खाणं किंवा तत्सम पदार्थ खाल्ला आहे का? उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये सांगा....