...तर मंत्रिपद काढून घेईन; पंतप्रधानांनी धरले नारायण राणेंचे कान

Narayan rane : 7 जुलै 2021 रोजी नारायण राणे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. यावेळी नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

Updated: Jan 4, 2023, 04:32 PM IST
...तर मंत्रिपद काढून घेईन; पंतप्रधानांनी धरले नारायण राणेंचे कान title=

Narayan rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभेची पायरी चढायला विसरले आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी टीका केली आहे. नारायण राणे प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांच्या स्वीय सहाय्यकाने (PA) अनेकांना गंडे घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना समज दिल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी कोकणात कणकवली येथे एका कार्यक्रमात बोलताना याबाबत भाष्य केले. या कार्यक्रमाला राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवणकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांनी मंचावरूनच नारायण राणेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले विनायक राऊत?

"मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता. या पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं," असा दावा विनायक राऊत यांनी केला.

नारायण राणेंना प्रश्नच समजला नाही

"लोकसभेच्या अधिवेशनात केरळच्या एका खासदाराने नारायण राणे यांना सभागृहात प्रश्न विचारला होता. याबाबत सभागृहात नारायण राणे यांची खिल्ली उडवण्यात आली होता. केरळच्या खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला होता. त्यावेळी नारायण राणे हेडफोन घालत होते. त्यांनी इंग्रजी प्रश्नाचे हिंदीत भाषांतर केले पण नारायण राणेंना तो प्रश्न अजिबात समजू शकला नाही, असेही विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणेंना फडणवीस शब्दही नीट उच्चारता येत नाही

"नारायण राणे यांना मालवणी आणि मराठी नीट कसे बोलावे हे आधीच माहित नाही. त्यांना फडणवीस हा शब्दही नीट उच्चारता येत नाही, हिंदी बोलणे तर लांबच राहिले. त्यामुळेच तो प्रश्न त्यावेळी समजला नाही आणि केरळऐवजी ते तामिळनाडूबद्दल बोलत राहिले. यामुळे त्यांची खूप फजिती झाली होता. त्यानंतर नारायण राणे कधीही लोकसभेची पायरी चढले नाहीत," असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

दोन वर्षापूर्वी नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान

7 जुलै 2021 रोजी नारायण राणे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. यावेळी नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात मोठा फेरफार करण्यात आल्यानंतर 36 नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांनाही स्थान देण्यात आले होते.