संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

राजीव कासले | Updated: May 3, 2024, 07:33 PM IST
संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश title=

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसचा (Congress) हात सोडत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम काय भूमिका घेणार याकडे होते सर्वांचे लक्ष होतं. दोन दिवसापूर्वी संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अखेर संजय निरुपम यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.

वीस वर्षांनी स्वगृही परतलो -  निरुपम
शिवसेनेत प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे. वीस वर्षानंतर मी स्वगृही परतत आहे, आणि मी एकटाच नाही तर कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं यावेळी निरुपम यांनी सांगितलं. हा सौभाग्याचा दिवस आहे, माझ्या अंगी बाळासाहेबांचे विचार भिनलेले आहेत, पण गेल्या वीस वर्षांपासून आपण काँग्रेसमध्ये होतो. 2004-5 मध्ये काही कारणामुळे शिवसेना सोडली. पण काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचारांवर काम करण्याची अडचण येत होती, आता ती अडचण आता आमच्यासमोर नाही असं निरुपम यांनी सांगितलं.

निरुपम यांच्या अनुभवाचा फायदा - मुख्यमंत्री
आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण काँग्रेसमध्ये काही लोकांनी दगाबाजी केली असा आरोप संजय निरुपम यांनी यावेळी केला. त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती, असंही निरुपम यांनी सांगितलं.

संजय निरुपम यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या उमेदवारांना होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांचे विचारांवर आपण सरकार स्थापन केलं आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक विकासकामं झाली आहेत, त्यामुळे अनेक लोकं सकारात्मक विचार घेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याआधी राज्यात नकारात्मक वातावरण होतं, सर्व जण आपल्या घारी कोव्हिड-कोव्हिड करत घरात बसले होते, पण सरकार स्थापन झालं आणि सर्व बाहेर आले आणि मोकळा श्वास घेऊ लागले, सर्व बंद पडलेले प्रकल्प सुरु झाले असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

निरुपम काँग्रेसमधून निलंबित
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. पक्षाविरोधात भाष्य केल्याने संजय निरुपम यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. निरुपम यांनी काँग्रेसच्या 'इंडिया' आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबद्दल आणि गटाचे नेते उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधानं केली होती