Maharashtra Politics : राज्यात आठवडाभरात घडलेल्या गोळीबारांच्या घटनांनी राज्यातील राजकारण तापलं आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून सरकारवर निशाणा साधला आहे.
"पंतप्रधान मोदी व अमित शहांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रावर लादले. या दोघांच्या छत्रछायेखाली गुन्हेगारी-गुंडगिरी जोरात फोफावली. भ्रष्टाचार, अपहरण, खंडणी, हत्या हा व्यापार भरभराटीस आला व इतर सर्व उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले तरी शिंदे-पवार काळात गुन्हेगारीचा व्यापार वाढला. महाराष्ट्रातील ठेकेदार आणि इंजिनीअर संघटनांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संयुक्त पत्र लिहून गुंडगिरीपासून संरक्षणाची मागणी केली. ‘सरकारात सहभागी असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते धमक्या देऊन वसुली करतात, खंडणी मागतात. नाहीतर ठेकेदारांची अधिकृत सरकारी कामे अडवून ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. आधी संबंधित ठेकेदारांची खोटी पार करायची व नंतर पैशांची मागणी करायची. यामुळे अनेक विकासकामे खोळंबून पडली. ठेकेदारांच्या मूळ रकमांपेक्षा खंडणी वसुलीचा आकडा जास्तच आहे व एकाच वेळी सत्तेतील तीन तीन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ही खंडणी देऊन आम्ही सगळे मेटाकुटीस आलो आहोत’ असे या पारीत सांगितले आहे व ते गंभीर आहे. महाराष्ट्र राज्याच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण?," असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
"रस्ते महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या माध्यमातून हजारो कोटींची कामे राज्यात सुरू आहेत. एका सार्वजनिक बांधकाम खात्यातच 50 हजार कोटींची कामे सुरू आहेत. रस्ते, इमारती, शासकीय संस्थांच्या उभारणीचे हे काम. शिवाय जिल्हा परिषदांच्या माध्यमांतून 15 हजार कोटींची कामे सुरू आहेत. जलसंधारण 3500 कोटी, सिंचन विभाग 2,500 कोटी, पर्यटन विभागाचा दोन हजार कोटींचा निधी विविध प्रकल्पांत वापरला जातोय. या सगळ्या कामांची ‘टेंडर्स’ ज्यांना मिळाली ते सर्व कंत्राटदार, छोटे उद्योजक, प्रकल्पांवर काम करणाऱ्या अभियंत्यांनी गेल्या दोन वर्षांतील खंडणीखोरीपुढे हात टेकले. एकीकडे राजकीय कार्यकर्ते, गुंड टोळ्या यांचे खंडणीचे वाटप व दुसरीकडे मंजूर झालेल्या रकमेतील 30-40 टक्के सरळ मंत्र्यांच्या हवाली. त्यामुळे विकासाला वाळवी लागली. अजित पवार यांचा सिंचन घोटाळा 70 हजार कोटींचा, असे स्वत: पंतप्रधान जाहीर करतात, पण तेच पवार आज राज्याचे अर्थमंत्री व सर्व प्रकारच्या निधी वाटपाचे गुन्हेगारीकरण झाले. भ्रष्टाचार हा शब्द त्यामुळे मागे पडला," असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे आज पूर्णपणे गुन्हेगारांच्या हाती गेली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात घुसून शिंदे गटाच्या लोकांवर गोळीबार केला. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंडांचे राज्य चालवीत आहेत व ते गुंडांना पोसत असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. त्यावर भाजपचे सर्व मंत्री व नेते तोंडास कुलूप लावून बसले, कारण महाराष्ट्रातील शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद आहेत. मुंबईतील लुटीचा मोठा वाटा दिल्लीतील भाजपच्या तिजोरीत जातोय हा त्यामागचा सरळ अर्थ. त्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राची पुरती वाट लागली तरी चालेल. भारतीय जनता पक्षाचाच एक आमदार स्वसंरक्षणासाठी हातात बंदूक घेतो व पोलीस स्टेशनात गोळीबार करतो. यावर गृहमंत्र्यांची प्रतिािढया शून्य! भाजपवाले उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात, पण शिंदे यांनी पोसलेल्या गुन्हेगारीवर, वसुली धंद्यांवर बोलत नाहीत. महाराष्ट्रात जे सुरू आहे त्या पापाचे ते वाटेकरी बनले आहेत. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे दाभाडे या वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाली. असे प्रकार महाराष्ट्रात रोज घडत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे मंत्रालयात व त्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका घेतात. गुंडांना त्यांच्या पक्षात प्रवेश देतात. तुरंगातील गुंडांची सुटका व्हावी यासाठी हस्तक्षेप करतात," असे संजय राऊत यांनी म्हटलं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस म्हणे 4 फेब्रुवारी रोजी झाला. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गुंडांची मांदियाळीच जमली. शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज गुंडांनी लावले. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. गुंडगिरीचे इतके उघड समर्थन व उदात्तीकरण महाराष्ट्रात याआधी कधीच झाले नव्हते. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या गुंडांना लगेच पोलीस संरक्षण देऊन सन्मान केला जातो, हे अत्यंत गंभीर चित्र आहे. ज्या गुंडांची मुंबई-पुणे-ठाण्यात पोलिसांनी धिंड काढली, त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी शिंदे यांनी आज पोलीस लावले. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारही त्याकामी मागे नाहीत. तेही गुंडांच्या भेटीला पुष्पगुच्छ घेऊन जातात व श्री. अजित पवार ‘मोदींकडे आपली वट आहे,’ अशी भाषणे करतात. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर अनेक गुंडांचे फोटो प्रसिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांच्याकडे ‘संघ’ परिवाराने ते फोटो पाठवायला हवेत. त्याचा उपयोग होणार नाही. तरीही महाराष्ट्रात त्यांनी काय कचरा उधळला आहे ते त्यांना कळू द्या. चोऱया, लुटमार, दहशत व हत्या हेच महाराष्ट्राचे प्राक्तन बनले आहे. खतरनाक गुंड मंत्रालयात शिरून त्यांचे ‘रिल्स’ बनवतात व त्यांना अडवणाऱया कर्मचाऱ्यांना शिंदे पुत्राच्या नावाने धमक्या दिल्या जातात. हे सर्व महाराष्ट्रात का घडावे? महाराष्ट्र गुंडांचे राज्य व्हावे यासाठीच मोदी-शहांनी शिवसेना फोडली. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर ललित टेकचंदानी याने दिलेला जबाब पोलिसांनीच उघड केला तर सरकारची उरली सुरली इज्जतही खतम होईल. शिंदे सरकारने गुंड पोसले. तसे गुंडांना संरक्षण देणारे पोलीस अधिकारीही पोसले. हे पोलीस अधिकारी गुंड टोळीचे सदस्य असल्याप्रमाणेच आज काम करीत आहेत. जणू काही शिंदे-पवार-फडणवीसांचे महाराष्ट्रातील गुंडाराज अनंत काळ चालणार आहे. गुंडांचे राज्य जाईल व त्यांना मदत करणाऱ्या खाकी वर्दीतल्या गुंडांच्या हस्तकांचेही पंचनामे होतील. महाराष्ट्रात पाप टिकणार नाही! मोदी यांच्या डोळ्यांसमोरच हे घडेल!," असेही राऊतांनी म्हटलं आहे.