सत्यजित तांबे यांची पक्षाला सोडचिठ्ठी? वडिलांवरील कारवाईनंतर उचललं मोठं पाऊल

Satyajeet Tambe : कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसने पक्षादेश न पाळल्याने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे

Updated: Jan 19, 2023, 11:07 AM IST
सत्यजित तांबे यांची पक्षाला सोडचिठ्ठी? वडिलांवरील कारवाईनंतर उचललं मोठं पाऊल title=

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (nashik graduate constituency election) युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांनी दाखल केलेल्या उमेदवारीवरुन राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. पक्षाने उमेदवारी दिलेली असताना डॉ. सुधीर तांबे (sudheer tambe) यांनी उमेदवारी दाखल न करता निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने कॉंग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. सुधीर तांबे यांच्या कारवाईवरुन कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी तांबे कुटुंबियांना पाठिंबा दर्शवला आहे. तर वरिष्ठ नेत्यांनी कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

याच कारवाईचे पडसाद आता पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांनी कारवाईविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांवरील कारवाईनंतर सत्यजित तांबे काँग्रेसपासून फारकत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेस पक्षाचे नाव आणि लोगो हटवल्याचा समोर आले आहे. यामुळेच आता सत्यजित तांबे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. तसेच सत्यजित तांबे यांनी त्यांच्या ट्विटर वॉलवर एक संदेश देखील लिहीला आहे. वारसाने संधी मिळते मात्र कर्तुत्व सिद्ध करावाच लागतं असा उल्लेख ट्विटरच्या वॉलवर केले आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांनी नेमका कोणावर निशाणा साधला आहे याची चर्चा सुरु झालीय.

satyajeet tweet

आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं - सत्यजित तांबे

अपक्ष उमेदवारीवरुन माध्यमांसमोर येत सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. 'सत्यजित तांबे हे अत्यंत अभ्यासू आणि चांगलं नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व आहे,' असे कपिल पाटील यांनी म्हटले. त्यानंतर आभार मानताना सत्यजित तांबे यांनी कपिल यांचे आभार मानताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही," असे सत्यजित तांबे म्हणाले