'शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास

'मी ज्या पक्षात असतो तिथे शंभर टक्के असतो, कोणी कितीही ऑफर दिली तरी माझ्याकडून दगा फटका होणार नाही' आंगणेवाडीतल्या जाहीर सभेत राणेंची तोफ धडाडली

Updated: Feb 4, 2023, 09:51 PM IST
'शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास

Maharashtra Politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला (Anganwadi Yatra) आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थित राहत भराडी देवीचं दर्शन घेतलं. आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने कोकणात आपलं वर्चस्व मजबूत करण्याच्या उदेदशाने भाजपकडून (BJP) आंगणेवाडीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) तोफ डागली. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही मविआ आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राणेंनी सांगितला राजकीय प्रवास
या कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितलं. माझ्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून (ShivSena) झाली, त्यानंतर काँग्रेस (Congress) आणि आता भारतीय जनता पक्षात आहे, हा शेवटचा प्रवास आहे. आता यानंतर कोणताही पक्ष नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. मी ज्या पक्षात असतो तिथे शंभर टक्के असतो, 99 टक्केही नाही, मला आवडत नाही. कोणी कितीही ऑफर दिली तरी माझ्याकडून दगा फटका होणार नाही. ऑफर देणाऱ्याला दगा होईल किंवा फटका होईल. पण माझ्याकडून होणार नाही असं राणे म्हणाले.

मविआ सरकारवर टीका
नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवही जोरदार टीका केली. माझ्या मागची गर्दी ही 33 वर्षांची मेहनत आहे, गावा-गावात घरा-घरात मी पोहोचलो आहे. जे माझ्यावर आता आरोप करत आहेत, त्यांना विचारा या कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी तुमचं योगदान काय? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. कोकणात अनेक पाटबंधारे प्रकल्पांचा काम सुरु आहे, पण यांनी या प्रकल्पासाठी कधी मेहनत किंवा एखादं पत्रही लिहिलं नाही, असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) नाव न घेता टीका केली. राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा सिंधुदुर्गातल्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. माझा देश जसा बदलतोय, तसा माझा सिंधुदुर्ग बदलतोय, असं राणे यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींची स्तुती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटतो. महासत्तेकडे नेणारे, आत्मनिर्भर भारत बनवणारे आमचे पंतप्रधान आहेत, अशी स्तुती नारायण राणे यांनी केली. आपला जिल्हाही विकास करतोय, पण कपाळकरंटे मध्येमध्ये येतात. या जिल्ह्यातील रस्त्यांसाठी काय केलं, शिक्षणासाठी काय केलं, रोजगारासाठी काय केलं गेल्या अडीच वर्षात काय केलं अशी टीका नारायण राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांना इशारा
शिवसेना घडवायला, वाढायला कोकणाने आधार दिला, शिवसेना वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात फिरणारे कोकणी होते, मग उद्धवा तू काय केलं रे बाबा अडीच वर्षात, दोनदा मासे खायला आला, कोकणात जिथे प्रकल्प येतात, तिथे विरोध करायचा, एनरॉनला विरोध, काम एकही करायचा नाही, पण टीका करायची असं सांगत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही जेव्हा फटाके काढू तेव्हा पळात भूईथोडी होईल, या जिल्ह्यातही उभं राहता येणार नाही असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.