'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका

Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.

आकाश नेटके | Updated: Apr 14, 2024, 02:45 PM IST
'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका title=

Sharad Pawar on PM Modi : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात या जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आलं. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शन, लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरिकत्व संहिता कायद्यांना प्राधान्य दिले आहे. मात्र या जाहीरनाम्यावरुन आता शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही फरक नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्त शरद पवार हे अकलूजमध्ये होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात काहीच फरक नाही अशी टीका केली.

"पंतप्रधान हे त्यांच्या पदाची अप्रतिष्ठा करत आहे. आपला कार्यक्रम सांगण्या ऐवजी नेहरुंवर टीका करत आहेत. त्यांचा भाषण ऐकलं ते म्हणतात की विरोधी पक्षाचा एकही उमेदवार निवडून देऊ नका. ही लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्ष असावा लागतो. यामुळे रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक वाटत नाही," असं शरद पवार म्हणाले. 'भाजपने जाहीरनाम्यात काय आश्वासन दिले यावर भाष्य करणे आता योग्य नाही. नुसते आश्वासने देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ईडी,सीबीआयचा गैरवापर करणे हे मोदींचे सूत्र आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत,' असेही शरद पवार म्हणाले.

"माढा सोलापूर मतदार संघामध्ये आम्ही लोकांनी सगळ्या सहकाऱ्यांसह प्राथमिक आढावा घेतला. सगळ्यांनी या निवडणुकीत उमेदवारांना जे काही करावे लागेल ते करण्याची तयारी ठेवली आहे. आज संध्याकाळी जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश निर्णय होईल. 16 एप्रिल रोजी सोलापूर मध्ये बैठक होईल. सोलापूर जिल्हा गांधी नेहरू विचारांचा जिल्हा आहे. या निवडणुकीत दोन्ही उमेदवार विजयी होईल, असे शरद पवारांनी म्हटलं.

"भाजपने आश्वासन काय दिले याबद्दल भाष्य न करणे योग्य होईल. अनेक प्रश्नांचे आश्वासन दिले आणि ते पूर्ण केले नाही. पाठीमागील जाहीरनाम्यातील आश्वासन अपूर्ण आहेत. त्यावर सविस्तर बोलू. आमच्या एकत्रित होण्याचा संदेश एका मतदारसंघ पुरता नाही तो सगळ्या राज्यात जातो. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. मागील निवडणुकीत आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या. पण यंदा चित्र वेगळं असेल," असे शरद पवरांनी स्पष्ट केलं.