मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचवेळी जरांगे आणि फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चाही झाली  

राजीव कासले | Updated: Sep 5, 2024, 08:53 PM IST
मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये  बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना :  मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) भेट घेतली.  दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चाही झालीय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. लोकसभेलाही महायुतीला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. त्यामुळेच दोघांमध्ये काय चर्चा झाली यावर चर्चा सुरु झाल्यात.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. त्यामुळेच सत्तार आणि जरांगेंमधल्या बैठकीत शेतकऱ्यांचं नुकसान आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती दोघांनीही दिलीय. मात्र याचवेळी जरांगेंची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) फोनवरुन चर्चा झाल्याचीही माहिती मिळतेय. मराठा आरक्षणावरुन जरांगेंनी फडणवीसांना वारंवार लक्ष्य केलं. त्यामुळेच दोघांमध्ये काय चर्चा याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

फडणवीसांशी फोनवरून काय चर्चा?
देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या यावर चर्चा झाली असं जरांगे यांनी सांगितलं आहे. मदत दोन वर्षांनी दिलीत तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाहीत असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

आता जरांगे आणि फडणवीस यांच्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर चर्चा झाल्याचं जरांगेंनी तरी सांगितलंय. मात्र जरांगेंची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार तातडीने मुंबईकडे रवाना झाले..त्यामुळे बंद दाराआड नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.