विधानसभेसाठी अमित शाहांचा 'महा'प्लॅन, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी इतक्या जागांचं टार्गेट

Maharashtra Politics : अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. नागपूर आणि संभाजीनगरात अमित शाहांनी बैठका घेतल्या. विदर्भासाठी महायुतीनं मिशन-45 ची घोषणा केली आहे. तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीनं कंबर कसली आहे. पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे.

राजीव कासले | Updated: Sep 25, 2024, 09:20 PM IST
विधानसभेसाठी अमित शाहांचा 'महा'प्लॅन, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी इतक्या जागांचं टार्गेट title=

नागपूरहून अमर काणेसह विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांनी (Amit Shah) महायुतीचा मेगाप्लॅन (Mahayuti Megaplan) जाहीर केलाय. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) महायुतीला यश मिळवून देण्यासाठी शाहांनी रोडमॅप सांगितल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात सत्तेचा सोपान गाठायचा असेल तर विदर्भ जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं शाहांनी विदर्भात महायुतीच्या 'मिशन 45'ची घोषणा केलीय. नागपुरात अमित शाहांच्या नेतृत्वात भाजपची बैठक झाली. या बैठकीत शाहांनी भाजप नेत्यांना कानमंत्र दिलाय.

अमित शाहांचा महाप्लॅन

- महाराष्ट्रात सत्ता मिळवायचे असेल तर विदर्भात सरशी साधावी लागेल

- 45 जागा महायुतीला जिंकायच्या आहेत

- आपल्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांनी काम करायचंय

- आपल्यातले सर्व मतभेद दूर करा - बाहेरून आलेले कार्यकर्ते तुमच्या वरती काम करायला आलेले नाही. ते तुमच्यासोबत काम करायला आले, अशा सूचना शाहांनी दिल्याची माहिती आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत भाजपनं विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी 44 जागांवर ताबा मिळवला आणि सत्तेत एंट्री घेतली. मात्र 2019च्या निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसला होता. तब्बल 15 जागांची घट होऊन भाजपला 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा विदर्भातलं आपलं स्थान मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. मात्र, आता विदर्भ भाजपच्या हातून गेल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

मराठवाड्यावरही भाजपचं लक्ष

विदर्भानंतर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय मराठवाड्यावर. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुतीनं मराठवाड्यासाठी मिशन-30ची घोषणा केली आहे. मराठवाड्यातील 30 जागांवर महायुतीच्या विजयाचा दावा अमित शाहांनी केलाय. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात तोडगा काढण्याचं वक्तव्य त्यांनी बैठकीत केल्याची माहिती आहे. संभाजीनगरात अमित शाहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीतला फटका आणि विदर्भात गेल्या विधानसभेला झालेली पिछेहाट. याची जखम भाजपला खोलवर झालेली आहे. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची साथ असणार आहे. महायुतीला रोखण्यात मविआला कितपत यश येतं, हे पाहणं रंजक असणार आहे.