Maharashtra Rain News : सावध राहा! पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत...

Maharashtra Rain News : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सध्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अद्यापही काही जिल्हे वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही. 

सायली पाटील | Updated: Jul 8, 2023, 08:19 AM IST
Maharashtra Rain News : सावध राहा! पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत... title=
Maharashtra Rain News monsoon latest weekend weather update

Maharashtra Rain News : संपूर्ण देशात सध्या विविध राज्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. अगदी हिमाचलपासून केरळापर्यंत आणि अरुणाचलपासून गुजरातपर्यंत हा पाऊस कमीजास्त प्रमाणात नागरिकांना दिलासा देताना दिसत आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती काही वेगळी नाही. राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये आतापर्यंत मान्सूनचे वारे पोहोचले असून पावसाला चांगली सुरुवातही झाली आहे. पण, राज्यातील काही जिल्हे मात्र इथं अपवाद ठरत आहेत. परिणामी त्या त्या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मागील काही दिवसांपासून कोकण आणि मुंबईमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली. याच धर्तीवर पुढील 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यालाही पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय राज्यात पुढचे 5 दिवस विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाडा, कोकणासह मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्याच्या उर्वरित भागात हवामानाचा अंदाज काय? 

पुढील 24 तासांमध्ये तुम्ही एखाज्या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी जाणार असाल तर, काही भागांमध्ये जाताना सावधगिरी बाळगा, कारण आयएमडीकडून राज्यातील काही भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिथे रायगड, रत्नागिरीमध्ये पावसानं चांगला जोर धरला असून, अनेक ठिकाणी असणारे धबधबे आणि जलस्त्रोत प्रवाहित झाले आहेत. ज्यामुळं पर्यटकांचा ओघ या ठिकाणांवर वाढताना दिसत आहे. सिंधुदुर्गासह गोंदिया, गडचिरोली भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सातारा, ठाणे आणि पालघर, मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. 

हेसुद्धा वाचा : लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या 'ब्लॉक'

देश पातळीवर पावसामुळं मोठं नुकसान 

पावसामुळं महाराष्ट्रातील शेतीच्या कामांना वेग आला असला तरीही देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस अडचणी निर्माण करताना दिसत आहे. अतिवृष्टीमुळं सध्या अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. तर, उत्तराखंडमध्ये धारचूला येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं 200 हून अधिक स्थानिक सध्या प्रभावित क्षेत्रात मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये सुरु असणाऱ्या चारधाम यात्रेवरही पावसाचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. केदारनात आणि बद्रीनाथ मंदिरांच्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्यामुळं आणि काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळं आता प्रशासनाक़डून काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.