Pune Khadakwasla Dam Water Discharge : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचबरोबर खडकवासला भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूये...पाऊस वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले असून, सर्व विभागांना समन्वय ठेवण्यास सांगण्यात आलंय. नागरिकांनीही सतर्क राबून काळजी घेण्याचं आवाहन फडणवीसांनी केले. फडणवीसांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली
पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील ( ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका , जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.
विशेषत: एकता नगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे ३ लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत असे त्यांनी निदर्शनास आणले. मुख्यमंत्र्यांनी यावर याठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे तसेच तसा आराखडा तयार करावा असे निर्देश दिले.
जलसंपदा प्रधान सचिव दीपक कपूर यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडतांना पुरेशी सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली तसेच पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी यावेळी पूर परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने केलेल्या मदत आणि बचाव कार्याविषयी सांगितले. धरण क्षेत्रात मोठा पाउस झाल्याचेही ते म्हणाले. भविष्यात या भागात पुराचा धोका होऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पात पूर संरक्षकाचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.
पूर परिस्थितीत पुण्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले पण नियमांमुळे नुकसान भरपाई मिळत नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावर पुणे पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून यावर मार्ग काढण्यास आणि तातडीने वाहनधारकांना नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना केल्या.
पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना विविध संस्थांकडून मदत करण्यात येत आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पुरेसे अन्नधान्य असलेले संच पूरग्रस्त एकतानगर, सिंहगड येथील गोरगरीब नागरिकांना पुरवावेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्याशी बोलून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस मनसे पदाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.