Kolhapur And Sangli Flood Risk : राज्य सरकारने तातडीने कर्नाटकच्या अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याची विसर्ग वाढवून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाऊले उचलावीत अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापूराचा धोका अटळ असल्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून देण्यात आला आहे. सध्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूरस्थिती आहे,
याशिवाय ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे,त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्नाटक सरकारवर दबाव आणून अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१३.६० मीटर आणि हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी ५१८ मीटर पर्यंत नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,तसेच अलमट्टी धरणातुन 4 ते साडे चार लाख क्यूसेक विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा करावा,आवश्यक असल्याची मागणी देखील कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून करण्यात आली आहे.
कोल्हापूर - रत्नागिरी राज्यमार्ग तब्बल पाच दिवसानंतर खुला झालाय. कोल्हापुरातल्या पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावर तब्बल चार ते पाच फूट पाणी होतं. मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा झाल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली.
साताऱ्यातील उरमोडी धरणातून 1629 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाचे 4 ही वक्र दरवाजे उचलून 1129 क्युसेक आणि पायथा वीज गृहातून 500 क्युसेक असा एकूण 1629 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरूच असून त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होते आहे.पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने हा विसर्ग सुरू केला आहे.
राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसला. एकूण २५ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक जास्त फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसलाय. जिल्हयातील एकूण 31 हजार 268 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. यात 62 हजार 435 शेतकऱ्याचं नुकसान झालंय. कृषी विभागाने ज्या ठिकाणी पूर ओसरलाय त्या ठिकाणी पंचनामे सुरू केले असून टप्प्याटप्प्याने हे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.