Maharashtra Rain Updates : साधारण गेल्या दहा दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतली नसल्यामुळं आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. ज्याप्रमाणं मागील आठवड्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली अगदी तसंच काहीसं चित्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही दिसणार आहे. कारण, हवामानशास्त्र विभागानं राज्यात पुढील पाच दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्याअंतर्गत कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज, तर विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुलनेनं मुंबईत मात्र पावसाचा जोर कमी होणार असून, शहरात संतताधार मात्र सुरुच राहील.
पुढील आठवड्याभरासाठी सांगावं तर, विदर्भ कोकणासह राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं घराबाहेर करताना या पावसापासून बचावासाठीची सर्व व्यवस्था करूनच निघा.
Maharashtra | IMD issues 'orange' alert for heavy to very heavy rainfall at isolated places for Palghar, Raigad, Ratnagiri, and Sindhudurg districts for tomorrow. pic.twitter.com/Gh4557z9HS
— ANI (@ANI) July 23, 2023
कोल्हापुरात पंचगंगा नदीने अखेर इशारा पातळी गाठली आहे. सोमवारी पहाटे 3 वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून आता नदीच्या पाणीपातळीची धोक्याच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पूराचं पाणी आलं असून अनेक ठिकाणची वहातुक खोळंबळी आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील धरणे देखील झपाट्याने भरत आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून नदी काठच्या गावांना स्थलांतर होण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
तिथं विदर्भात पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून, सखल भागांमध्येही पाणी साचल्याच्या घटना घडल्या असतानाच कोकणातही परिस्थिती वेगळी नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कोकणातील अनेक जवलस्त्रोत प्रवाहित झाले असून, नद्यांची पाणीपातळीही वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी (खेड), कोदवली नदी (राजापूर) आणि शास्त्री नदी (संगमेश्वर) येथे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसानं चांगला जोर धरल्यामुळं राज्यातील बहुतांश पावसाळी पर्यटनस्थळांना बहर आल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं गुजराथ सीमावर्ती भागातील नाशिकच्या सुरगाण्यामध्ये निसर्ग बहरला असून, त्याचं विलोभनीय रुप पाहण्यासाठी गुजरात, मुंबई, पुण्यातील पर्यटक इथं येताना दिसत आहेत. सुरगाणा तालुक्यातील नार, पार, अंबिका, तान, मान अशा सर्वच नद्यांना पुर आल्याने या भागातील बंधारे, तलाव भरुन वाहत आहे. त्यामुळं प्रशानही सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.