मुंबई : राज्यात Coronavirus कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर असणारा ताण वाढल्याचं पाहायला मिळत आहे सोमवारी राज्यात कोरोनाचून सावरून घरी परतणाऱ्या रुग्णांचा आकडा ६५ होता. तर, एकूण ९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
मृतांमध्ये मुंबईतील ७ आणि मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे सोमवारी महाराष्ट्रात एकूण ४६६ नवे कोरोना रुग्ण आढळले. ज्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता ४६६६ वर पोंहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती आहे.
कोरोना विषाणूती झपाट्याने होणारी लागण पाहता हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांवर चाचण्यांचा वेग हा वाढवण्यात आला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत हाती असणाऱ्या माहितीनुसार ७६,०९२ नमुन्यांपैकी ७१,६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोविड१९ रुग्णांच्या विश्लेषणातून समोर आलेल्या महत्वपूर्ण बाबी –
राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० ( ८१%) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना ( १७ %) रुग्णांना लक्षणं होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण ( २ %) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५६४८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २१.८५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलं आहे.