राज्यात नवा पॉलिटीकल ड्रामा? निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण होणार आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीची आजच घोषणा होणार आहे. दिल्लीतील या पत्रकार परिषदेची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्रात सात आमदारांना शपथ देण्यासाठी लगबग सुरु असल्याचं दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 15, 2024, 10:04 AM IST
राज्यात नवा पॉलिटीकल ड्रामा? निवडणूक जाहीर होण्याच्या 3 तास आधी 'हे' 7 जण होणार आमदार title=
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची घोषणा आजच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद बोलावली असून यामध्येच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचरसंहिता लागू होईल. आज दुपारी साडेतीन वाजता होणारी पत्रकार परिषद विज्ञान भवन येथे होणार आहे. एकीकडे दिल्लीमध्ये या पत्रकार परिषदेची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी आजच पार पडणार आहे. मात्र आता यावरुनही वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून या शपथविधीविरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे निवडणुकांची घोषणा होणार असताना त्याच्या काही तास आधीच शपथविधी पार पडत असल्याने राज्यात नवं राजकीय नाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. 

आज दुपारी शपथ विधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. आज शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सदस्यांमध्ये महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ, सरचिटणीस विक्रांत पाटील, पोहरादेवी संस्थांचे महंत बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, माजी खासदार हेमंत श्रीराम पाटील, डॉ मनीषा कायंदे यांचा समावेश असेल. 

राज्यपालनियुक्त आमदार प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; घेणार मोठा निर्णय

महायुतीच्या राज्यपाल नियुक्त जागा नियुक्त केल्या तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. 12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी 7 ऑक्टोबरला सदर याचिकाचे युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर अजूनही निकाल बाकी आहे. या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी जर या नावांना मान्यता दिली तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा >> आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

उद्या उमेदवारांची यादी होणार जाहीर?

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक दीड महिन्याच्या आत होऊन निकाल लागेल असं सांगितलं जात आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकार 27 नोव्हेंबरपर्यंत आहे.