Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंच्या आजारपणावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी उपहासात्मक पद्धतीने शिंदेंवर निशाणा साधला. आजापणामुळे ते शपथविधीला तरी येणार आहेत का अशी चिंता लागली असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.
पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्याचा उल्लेख करत राऊत यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत, म्हणजे त्यांची तब्बेत किती खराब आहे बघा. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब करु नका," असा उपहासात्मक टोला राऊत यांनी लगावला. पुढे बोलताना, "5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला की एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना यावं लागेल याबद्दल अनेकजण चिंतेत आहेत. त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यांना डॉक्टरची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे? त्यांना बरं करण्यासाठी हा मंत्रिक अमित शाह पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत? त्यांच्या अंगातील भूतं उतरवायला हवी आहेत आता. ते काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे," असा टोला राऊत यांनी लगावला. दरम्यान, आजच काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या दरे गावातून मुंबईला येणार आहेत.
गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासाठी शिंदेची शिवसेना प्रयत्न करत असल्याचा उल्लेख करत राऊत यांना प्रश्न विचारला असता. "ते ठरवू शकतात का हे? तर नाही. ते अमित शाह आणि नरेंद्र मोदी ठरवणार. यांच्या हातात काही नाही. रुसवे, फुगवे आणि मग शरणागती एवढेच यांच्या हातात आहे. ठाकरेंनी काही वर्षापूर्वी घेतलेला हा निर्णय याचसाठी होता," असं राऊत म्हणाले.
विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनासंदर्भात राऊतांना विचारण्यात आलं. पत्रकाराने, प्रश्नोत्तराचा दिवसच कापला आहे, असं म्हणत राऊतांना प्रश्न विचारला. "याला म्हणतात मोदी किंवा अमित शाह पॅटर्न. केंद्रीत लोकसभा, राज्यसभा अशीच चालवतात," असा टोला लगावला. महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असणार आहे. विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल.