'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरुन महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्येही चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 18, 2024, 01:34 PM IST
'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM? title=
राज्याला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीदरम्यान जागावाटप आणि इतर वाटाघाटी सुरु झालेल्या असतानाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यासंदर्भात दोन्ही गटाकडून जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावं आघाडीवर असून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचं नाव त्यांच्या पक्षाकडून पुढे केलं जात आहे.

शरद पवार काँग्रेसकडून कोणाच्या नावाची चर्चा?

एकीकडे ठाकरेंच्या पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांची भूमिका तीच आमची भूमिका असं आधीच स्पष्ट केलं असून काँग्रेसने मात्र आधी सत्ता मिळवण्यास प्राधान्य असावं असं म्हणत कोणत्याही नावाचा थेट उल्लेख टाळला आहे. यासाऱ्यादरम्यान आता अचानक राज्याच्या राजकारणामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेत आला आहे. एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल, असं विधान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. त्यांनी थेट नावं घेत हा मान कोणाला मिळू शकतो किंवा यासाठी कोण पात्र आहे याबद्दलही भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, 'तुम्ही कार..'

पहिली महिला मुख्यमंत्री?

'महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल,' असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. "अनेक महिला सक्षम आहेत. सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांच्यासहीत काँग्रेसमध्येही काही महिला या पदासाठी सक्षम आहेत," असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर खरंच राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का? असा सवाल वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी, "मी महिला म्हणून माझं मत मांडतेय. मी कालसुद्धा तीच भूमिका मांडली, की महिला म्हणून नक्कीच आम्हाला आमचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. प्रत्येक पक्षामध्ये सक्षम महिला आहेत," असं सांगितलं.

नक्की वाचा >> '...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता?

थेट महिला नेत्यांची नावं घेतली

पुढे बोलताना कोणत्या महिला मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम आहेत त्यांची थेट नावच वर्षा गायकवाड यांनी घेतली. "काँग्रेसमध्ये आम्ही पाच-सहा जणी आहोत ज्या चांगलं काम करतोय. सुप्रियाताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. रेश्माताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. आमच्या पक्षात एक पद्धत अवलंबली जाते. आमदार निवडून येतात तेव्हा ते एकत्र येऊन निर्णय घेतात. पक्षाचा निर्णय हा सर्वात मोठा असतो. कार्यकर्ता म्हणून त्यात आमची भूमिका राहते," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

"एक महिला म्हणून मला नक्कीच वाटतं की महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. शेवटी हा निर्णय पार्टीचा असून पार्टी तो निर्णय घेत असते," असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.