सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 1, 2024, 06:52 AM IST
सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारी title=
Maharashtra Weather Alert IMD Predicts light to moderate rainfall & gusty winds in parts of maharashtra

Maharashtra Weather Alert: ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात आज रविवार 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. त्यामुळं देशभरात लक्षणीय प्रमाणात पाऊस होणार आहे. सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनालादेखील वरुण राजाची हजेरी असणार आहे. मुंबईत आज 1 सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर, विदर्भात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

 नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर,चंद्रपूर,आणि यवतमाळ या जिल्ह्यांना  1 सप्टेंबर रोजी रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती वर्धा आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी 1-2 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. तर, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 ते 4 सप्टेंबर आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.