Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाच बरेच बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीनं हजेरी लावली आणि शेतात बहरलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये आता अवकाळीनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण कायम राहणार असून, किमान तापमानात वाढ होणार आहे.
फक्त मराठवाडा आणि विदर्भच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येसुद्धा पावसाचं वातावरण असून, यामुळं ढगांचं सावट कायम राहणार आहे. तर किनारपट्टी भागामध्ये हवेतील आर्द्रता अधिक असेल ज्यामुळं उष्णतेचा दाह अधिक जाणवणार आहे.
सध्याच्या घडीला राज्यात किमान तापमान 10 अंशांच्या वर राहणार असून कमाल तापमान 35 अंशांवर पोहोचणार आहे. ठाणे, मुंबई आणि पालघरमध्ये हा आकडा 38 ते 40 अंशांपर्यंतही पोहोचू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही तापमानवाढ आता कायम राहणार असून, राज्यात हळुहळू उन्हाळ्याची सुरुवात होताना दिसणार आहे.
तिथं देश पातळीवर उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्येही पावसाच्या सरींची बरसारत सुरु असून, अधूमधून इथं हा पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर, काश्मीरच्या खोऱ्यात मात्र पारा उणे 3 अंशांच्याही खाली राहणार असल्यामुळं तेथील थंडीचं वातावरण कायम राहणार आहे.