Maharashtra Weather : मार्च महिन्यापासून सूर्याचा दाह चांगलाच जाणवत असताना एकाएकी पावसानं हजेरी लावली आणि काही भागांमध्ये तापमान काही अंशी कमी झालं. गारपीटीमुळं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. ही परिस्थिती असतानाच आता पुन्हा एकदा सूर्य आग ओकण्यास सुरुवात करणार आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तापमानात तब्बल 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या तापमानवाढीचा सर्वाधिक तडाखा कोकण पट्ट्याला बसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकणात एकिकडे तापमानात वाढ होईल, तर काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अवकाळी पावसाचा फटका फळं आणि भाज्यांवर होणार असल्यामुळं आर्थिक नुकसानही ओढावणार आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश निरभ्र असेल. त्यातच उष्णतेची तीव्रतासुद्धा पुन्हा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. दुपारच्या वेळेत उन्हाच्या झळा काहीशा अडचणीची निर्माण करु शकतात. त्यामुळं उष्माघात टाळण्यासाठीचे उपायही तयार ठेवा असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
कोकणावर पावसाचे ढग असतानाच विदर्भात मात्र आकाश निरभ्र राहील असा अंदाज वर्तण्यात येत आहे. असं असलं तरीही विदर्भातील काही जिल्हे मात्र याला अपवाद ठरतील. कारण, या जिल्ह्यांमध्ये 10 मार्चलाही पावसाच्या सरी बरसतील. मध्य महाराष्ट्रात तापमानातत तब्बल 6 अंशांची वाढ अपेक्षित आहे ज्यामुळं उकाडा आणखी वाढेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशचा उत्तर भाह, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल. तर, पश्चिम बंगालमध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस अशी परिस्थिती असेल. छत्तीसगढ, सिक्कीम आणि आसाममधील काही भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरी बरसतील. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतामध्ये येत्या काही दिवसांत कमाल तापमानात धीम्या गतीनं वाढ होईल.