काश्मीरच्या थंडीमुळं महाराष्ट्रातच हुडहूडी; कुठं वाढला गारठा? पाहा...

Maharashtra Weather Updates: देशातील बहुतांश भागांमध्ये सध्या वातावरणाची वेगळी रुपं पाहायला मिळत असून, हा रुपं तितक्याच वेगानं बदलतही आहेत.  

Updated: Jan 30, 2024, 11:26 AM IST
काश्मीरच्या थंडीमुळं महाराष्ट्रातच हुडहूडी; कुठं वाढला गारठा? पाहा...  title=
Maharashtra weather news cold wave to make return because of western disturbance snowfall in kashmir

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून काढता पाय घेतलेली थंडी आता पुन्हा एकदा राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचली असून, तिचा गारठा राज्याच्या बहुतांश भागांमध्ये जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पाऊस आणि थंडी असं दुहेरी चित्र पाहायला मिळू शकतं. इतकंच नव्हे तर, किमान तापमानात तीन अंशांची घटही नोंदवली जाऊ शकते. 

IMD कडूनही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याची सुरुवात काही दिवस आधीच झाल्याची चिन्हं राज्यात पडलेल्या थंडीमुळं दिसू लागली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पुणे आणि मुंबईमध्ये धुरक्याचं वातावरण असून, तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मागील दोन दिवसांमध्ये हवामानात काहीसा फरक पाहता किमान तापमानात काही अंशांची वाढ नोंदवण्यात आली होती. पण, पुन्हा एका पश्चिमी झंझावाताचे परिणाम दिसू लागल्यामुळं राज्यातील थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हं आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार असून, बहुतांश भागांमध्ये धुक्याची चादरही पाहायला मिळणार आहे. 

देशाच्या उत्तरेकडे पाऊस? 

हिमालयाच्या पश्चिम क्षेत्राकडे 29 जानेवारीपासून हवामानात बदल झाले असून, उत्तरेडे असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा हा अंदाज कायम राहणार असून, त्यामुळंही थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काश्मीरचं खोरं आणि नजीकच्या भागामध्ये तापमान उणे 2 अंशांहूनही कमी होणार असून, जोरदार बर्फवृष्टीचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, हरियाणा, दिल्ली आणि पंजाब प्रांतावर धुक्याची चादर असल्यामुळं या भागांमध्ये दृश्यमानताही कमी राहील असा इशारा देण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Job News : हुर्रेSsss...देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु  

थोडक्यात सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातही थंडीचे दिवस परतले असून, आता ही थंडी नेमकी आणखी किती काळ देशातला मुक्काम कायम ठेवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणाह आहे.