Maharashtra Weather News : राज्यात सध्या सुरु असणारा उन्हाळा दर दिवशी नवनवीन विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील हा उष्णतेचा वाढता दाह काही केल्या कमी होणार नसून, त्यात दिवसागणिक वाढच होत राहणार आहे. दिवसा आणि दुपारच्या प्रहरी आग ओकणारा सूर्य त्याच्या उष्णतेचे परिणाम 24 तास दाखवणार असून, आता राज्याच्या बहुतांश भागांमधील रात्रीच्या वेळचं तापमानही अपेक्षेहून जास्त राहणार आहे. थोडक्यात राज्यातील उष्णतेची लाट आता आणखी सक्रिय, तीव्र होताना दिसेल.
एकिकडे सूर्याचा प्रकोप सुरु असतानाच दुसरीकडे राज्यात वादळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या नगरमधील जेऊर येथे देशातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येत्या काही दिवसांत अडचण वाढवताना दिसेल. भर उन्हात अवकाळीचं सावट असल्यामुळं उकाडा आणखी जाणवेल. राज्याच्या धाराशीव, नांदेड, लातूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, विदर्भाच्याही बहुतांश भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे.
गरज नसेल तर घराबाहेर पडणं टाळा असं आवाहन यंत्रणा नागरिकांना करत असून, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या राज्यात जळगाव 41अंश सेल्सिअस, सांगली 39.5 अंश सेल्सिअस, संभाजीनगर 38.4 अंश सेल्सिअस, बारामती 37.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात वीजांच्या कडकडाटासह मधूनच पावसाची हजेरी असू शकते असाही इशारा हवामान विभागानं दिल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. सध्या कमी दाबाचे वारे पूर्व आणि मध्य विदर्भाच्या दिशेनं वाहत असल्यामुळं इथं तुरळक पावसाची शक्यता आहे. तर, नाशिक आणि जळगावमध्येही अवकाळीची हजेरी पाहायला मिळू शकते.
कोकणासह उत्तर महाराष्ट्रातही वातावरण ढगाळ राहील असा इशारा हवामान विभागां दिला असून, इथं ताशी 17 ते 18 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा, कोल्हापुरातील हवेत आर्द्रतेमध्ये घट होणार असल्यामुळं इथं उकाडा अधिक भासणार आहे. राज्याच्या कोकण भागात कमाल तापमान 37 अंश राहणार असून, रत्नागिरी आणि ठाण्यात हा आकडा 34 अंशांपर्यंत स्थिरावू शकतो. तर, मुंबईमध्येही समुद्रावरून येणारे उष्ण वारे नागरिकांच्या अडचणीत भर टाकण्याचा अंदाज आहे.