Maharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?

Maharashtra Weather News : पावसाचं नेमकं चाललंय काय? काळ्या ढगांचा चकवा आता चिंता वाढवतोय.... जाणून घ्या हवामान विभागाचं यावर नेमकं काय मत?   

सायली पाटील | Updated: Jul 6, 2024, 06:45 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?  title=
Maharashtra Weather News Monsoon to get more active in konkan vidarbha drizzling

Maharashtra Weather News :  मान्सूच्या धर्तीवर राज्यात जून महिन्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेतीची कामं हाती घेतली. अनेक ठिकाणी पेरणीची कामं उरकून पिकांचे हिरवे कोंबही तररारून आले. आता पाऊस जोर धरणार आणि शेतशिवार बहरणार असा अंदाज असतानाच पावसानं मात्र अचानकच उघडीप देण्यास सुरुवात केली आणि चिंता वाढली. 

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये पावसाच्या तुरळक सरी वगळता मुसळधार पावसानं हजेरी लावलेली नाही. ज्यामुळं मुंबई शहरात आर्द्रतेचं प्रमाण वाढून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिथं कोकण आणि विदर्भ मात्र या स्थितीला अपवाद ठरत आहेत. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर, कोकण आणि विशेष म्हणजे कोकणातील बहुतांशी किनारपट्टी गावांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात पावसाच्या एकंदर स्थितीला अनुसरून सध्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस उसंत घेताना दिसेल. 

मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्याच्या काही भागांवर मान्सूनची कृपा पाहायला मिळणार असून, यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, सातारा इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : मुलींच्या फीमाफीची बजेटमध्ये घोषणा, कधी निघणार शुल्कमाफीचा जीआर?

 

सध्या राजस्थानच्या बिकानेर क्षेत्रापासून बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, आणखी एक पट्टा मणिपूर राजस्थानदरम्यानच्या भागावरही सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे. तिथं गुजरात आणि केरळदरम्याही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रात पावसाची ये-जा कमी झाली असली तरीही देशभरात मात्र मान्सून आता समाधानकारकरित्या सक्रिय होताना दिसत आहे. 

पावसाळी सहलींचा बेत आखताय? 

पावसाळ्यादरम्यान सध्या सह्याद्रीची रांग, पश्चिम घाट परिसर इथं कमालीची हिरवळ पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी धबधबेही प्रवाहित झाले आहेत. याच ठिकाणांना भेट देत तुम्ही पावसाळी सहलींचा बेत आखणार असाल, तर काही ताम्हिणी घाट, माळशेज इथं पाऊस काही ठिकाणी उघडीप देण्याची शक्यता आहे. ज्यामुळं तुमच्या उत्साहावर विरजण पडू शकतं. दरम्यान काही घाटमाथ्यांवर मात्र दाट धुकं आणि हवेतील गारवा यामुळं आल्हाददायक वातावरणही नाकारता येत नाही.