Maharashtra Weather News : पावसाळ्याच्या ऋतूची सांगता झाली असताना हिवाळ्याची चाहूल लागेल असाच अंदाज वर्तवला जात होता. तसं वातावरणही तयार झालं. पण, अरबी समुद्रासह बंगलाच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या प्रणालीमुळं पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाली आणि थंडीची चाहूलही पाठ फिरवताना दिसली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये नोव्हेंबरची सुरुवातही उकाड्यानंच झाली आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि कोकण मात्र इथं अपवाद ठरले आहेत. राज्यात सध्या तापमानात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांना पावसानं झोडपलं. सांगलीमध्या पावसानं वादळी हजेरी लावली, तर साताऱ्यात घाटमाथ्यावरही ढगांचं सावट पाहायला मिळालं. पुढील 24 तासांमध्येही वातावरणाचं हेच चित्र पाहायला मिळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही. सध्या तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाच्या या स्थितीत पॅसिफीक महासागरातील ला निना स्थितीचे परिणाम होणार असून, त्यामुळं नोव्हेंबर महिना संपूर्ण देशासाठीच उष्णतेचा राहणार आहे. सध्या उत्तर भारतात कमाल आणि किमान तापमान सरासरी दोन ते पाच अंश सेल्सिअसनं जास्त असून, पश्चिमी झंझावात सक्रिय नसल्यामुळं उत्तर भारतातही थंडीची हजेरी नाही. ज्यामुळं महाराष्ट्रावरही सूर्यनारायणाचा प्रकोप कायम असल्याचच चित्र आहे.