Maharashtra weather news : उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींसह पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं असतानाही हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमधील हवामानाच्या या स्थितीचे महाराष्ट्रातील वातावरणावर फारसे परिणाम होताना दिसत नाही आहेत. काही दिवसांपूर्वीच्या अवकाळीच्या माऱ्यानंतर राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा भागावर सध्या ढगांची चादर अधूनमधून पाहायला मिळत असली तरीही इथं पावसाचा इशारा नाही. उलटपक्षी या ढगाळ वातावरणामुळं आता उष्णतेचा दाह आणखी जाणवण्याची शक्यता आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानाचा आकडा 37-38 अंशांच्या पलिकडे पोहोचल्यामुळं उकाडा आणखी तीव्र होत असल्याचच आता स्पष्ट होऊ लागलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील हवामान कोरडं असून उत्तरेकडे आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये सक्रिय असणाऱ्या थंड हवेच्या झोताचे राज्यावर परिणाम होताना दिसत नाहीयेत.
वाशिम 39.4 अंश सेल्सिअस
सोलापूर 39.2 अंश सेल्सिअस
विदर्भ, मराठवाडा 38 अंश सेल्सिअस
पुणे 36.9 अंश सेल्सिअस
कोल्हापूर 37.5 अंश सेल्सिअस
सातारा 36.9 अंश सेल्सिअस
रत्नागिरी 33.7 अंश सेल्सिअस
नाशिक 35.8 अंश सेल्सिअस
राज्यातील कमाल तापमानाचा आकडा वाढत असतानाच किमान तापमानातही वाढ नोंदवली जात आहे. मुंबईत किमान तापमान 22 अंशांच्या घरात पोहोचल्यामुळं शहरातील उकाड्याच्या तीव्रतेचा एकंदर अंदाज लावता येत आहे. दरम्यान, पुढील दिवसांमध्ये उष्णतेचा हा दाह कमी होण्याची चिन्हं नसून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं आरोग्य विभागाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही देण्यात येत आहे.