Maharashtra Weather Update : जानेवारी महिन्याच्या अखेरीस थंडीनं हजेरी लावली आणि पुन्हा अचानक ती नाहीशी झाली. अगदी फेब्रुवारी महिना संपला तरी थंडीचा हा लपंडाव मात्र काही केल्या संपण्याचं नाव घेत नव्हता, इथं मार्च उजाडला आणि आता कसली थंडी अन् कसलं काय असं वाटत असतानाच या थंडीनं पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रविवारपासूनच मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये अचानकच थंड वाऱ्यांनी वातावरण 360 अंशांनी बदललं. दुपारच्या वेळी जाणवणारा उन्हाचा दाहसुद्धा सोमवारी तुलनेनं कमीच जाणवला. हवामान विभागाच्या माहितीनुसार सोमवारी मुंबईमध्ये 19 अंश इतक्या तापमानाची तर, पश्चिम उपनगरामध्ये 17 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. 2020 च्या मार्च महिन्यानंतर हे सर्वात नीचांकी तापमान असल्याची माहिती हवामान विभागानं दिली.
इथं मुंबईत आलेल्या शीतलहरीमुळं वातावरणाच वेगळीच छटा पाहायला मिळत असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र सूर्यनारायणानंही आपलं खरं रुप दाखवण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला मध्य महाराष्ट्रावरूनही अवकाळीचं सावट परतलं असून, तिथपासून उत्तर महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातून अवकाळीनं आता काढता पाय घेतला असला तरीही या पावसानंतरचा उकाडा मात्र नागरिकांना हैराण करताना दिसत आहे. पुढील किमान दोन दिवसांसाठी हवामानाचं हेच रुप सर्वांना पाहावं आणि सोसावं लागणार आहे. सध्या विदर्भात पारा 35 अंशांच्या पलीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रातही 37 अंशांपर्यंत गेल्यामुळं आता राज्यात उन्हाळ्याची टप्प्याटप्प्यानं सुरुवात होत असल्याचं जवळपास स्पष्टच झालं आहे.
Skymet या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार 5 ते 7 मार्चदरम्यान हिमालयाच्या पश्चिमेकडील भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. तर, 5 मार्चपासून एक नव्यानं सक्रिय झालेला पश्चिमी झंझावात या भागांना अधिकाधिक प्रभावित करु शकतो. ज्यामुळं जम्मू काश्मीर, गिलगिलट, बाल्टीस्तान, लडाख, मुजफ्फराबाद, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची हलकी रिमझिम पाहायला मिळू शकते. तर काही भागांमध्ये हिमवृष्टीचीही शक्यता आहे,. तिथं बिहार, झारखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्येही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.