Maharshtra Weather Updates : अवकाळीचं सावट असल्यामुळं राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. इथं ही शक्यता असतानाच तिथं, निफाड, धुळे आणि जळगावात मात्र तापमान 10 अंशांहूनही कमी आकडा दर्शवत आहे. थोडक्यात राज्यातील थंडीचा कडाका या अवकाळीलाही दूर लोटताना दिसत आहे. फक्त मध्य आणि उत्तर महाराष्ट्रच नव्हे, तर कोकण पट्टा, पालघरसह ठाणे आणि मुंबईतही या थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.
हवामान विभागानं सध्याच्या तापमानाचं निरीक्षण केलं असता मुंबई शहर आणि उपनगरात संध्याकाळच्या आणि रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याची बाब लक्षात येत आहे. मुंबईत 14.8 अंश सेल्सिअसपर्यंत इतक्या कमी तापमानाची नोंद नुकतीच करण्यात आली असून, हे यंदाच्या हंगामातील सर्वाच नीचांकी तापमान असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरींमुळं शहरातील तापमानात घट झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. थोडक्यात सध्या उकाड्यापासून काहीसं दूर येत गुलाबी थंडीचा आनंद लुटण्याची संधी मुंबईतील नागरिकांना मिळत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
येत्या 48 तासांमध्ये अर्थात शुक्रवारपर्यंत हवामानाची अशीच स्थिती शहरात कायम राहणार असल्याचा इशारा देत हवामान विभागानं मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.
22 तारखेपासून विदर्भावर अवकाळीचे ढग घोंगावू लागले आणि मंगळवारी विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळीनं हजेरीसुद्धा लावली. या अवकाळीनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून, हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज या चिंतेत आणखी भर टाकताना दिसत आहे. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार विदर्भात 25 जानेवारीपर्यंत काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरु असल्यामुळं अवकाळीचा मारा झाल्यास भरीस आलेला हरभरा आणि तूर पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा अवकाळी आता नेमकं किती नुकसान करतो यावरत शेतकऱ्यांची नजर असणार आहे.