Maharashtra Weather Updates : मंगळवारपासूनच राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. ज्यानंतर हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पारा बहुतांशी खाली उतरला आणि या भागात थंडीचा कडाका वाढला. पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र मात्र यासाठी अपवाद ठरत होता. आता मात्र राज्याच्या या भागातही थंडीची चाहूल लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार थंडीचं हे वातावरण पुढील 48 तासांसाठी कायम राहणार असून, राज्यातील किमान तापमानात काही अंशांनी घट नोंदवली जाणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये सकाळच्या वेळी तापमानत घट नोंदवली जाणार असून, पर्वतीय क्षेत्रांमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळेल. येत्या काळात मुंबई आणि कोकणासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचं चित्र कायम राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र उन्हाचा दाह वाढून कमाल तापमानात काहीशी वाढ होणार आहे. महिन्याच्या शेवटी अर्थात वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थंडी पुन्हा वाढणार असून, यादरम्यान, मुंबईच्या किनारपट्टीवरून ताशी 20 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं शहरातील नागरिकांना झोंबणाऱ्या थंडीला सामोरं जावं लागू शकतं.
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अर्थात काश्मीर (Kashmir) , हिमाचल (Himachal Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) भागातून वाहणारे वारे पूर्वोत्तर राज्यांकडून वाहत महाराष्ट्रात शिरकाव करणार आहेत. सध्या मध्य प्रदेशातील थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे येत आहेत. ज्यामुळं राज्यात थंडीचा प्रभाव वाढून तापमान सरासरीपेक्षाही कमी आकडा गाठू शकतं.
सध्या उत्तर भारतामध्ये धुक्याच्या चादरीसोबतच बर्फाची चादरही पाहायला मिळत आहे. येथील बहुतांश राज्यांमध्ये तापमान 4 अंशांच्याही खाली उतरलं आहे. तर, दृश्यमानताही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे ज्यामुळं वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गांवरही खोळंबा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला या राज्यांमध्ये सतत होणारी बर्फवृष्टी पाहता हिवाळी सहलींच्या निमित्तानं या भागांमध्ये येणाऱ्यांसाठी हा ऋतू एक पर्वणी ठरत आहे.