Maharashtra Weather Updates : राज्यावर असणारं काळ्या ढगांचं सावट ऐन हिवाळ्यात आल्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यात शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दर दिवसागणिक बदलणाऱ्या या हवामानाचे तालरंग आता पुन्हा बदलले असून, दडी मारून बसलेल्या थंडीनं मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे, पालघर पट्ट्यावर पुन्हा पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. पण, तरीही राज्यावरील पावसाचं सावट काही दूर झालेलं नाही.
सध्याच्या घडीला राज्यातील किमान तापमाना वाढ नोंदवली गेली असून, आता शुक्रवारी (5 जानेवारी 2024) राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ज्यामुळं कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होऊ शकते. तिथं विदर्भामध्ये शुक्रवारी पावसाचा अंदाज असून, शनिवारीसुद्धा पावसाळी वातावरण असेल पण पावसाची हजेरी मात्र पाहता येणार नाही.
अरबी समुद्राच्या आग्नेय भागाकडे सक्रीय असणारा कमी दाबाचा पट्टा आता तीव्र होत नसून, तो निवळताना दिसत आहे. तर, लक्षद्वीपच्या किनारपट्टी भागावर वाऱ्यांची चक्राकार स्थिती पाहता येत आहे, ज्यामुळं कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत आता नव्यानं कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होताना दिसत आहे. कर्नाटकातील या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम उत्तर प्रदेशापर्यंत दिसत असून, महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट याच हवामान स्थितीचे परिणाम असल्याचं स्पष्ट होत आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या धर्तीवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या भागांमध्ये 5 आणि 6 जानेवारीला धुक्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला देशात जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इथं थंडीचा कडाका वाढतच चालल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दल लेकही गोठल्यामुळं बर्फाची चादर तोडून नागरिकांना किनाऱ्यांपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. या साऱ्यामध्ये पर्यटकांनी काश्मीरच्या दिशेनं वाट धरल्यामुळं या भागात गर्दी करण्यास सुरु केली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही थंडीचं हेच रुप पाहायला मिळत आहे.