Weather Updates : हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचं सत्र सुरु झालं असून, ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढताना दिसणार आहे. सध्याच्या घडीला देशात पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं उत्तरेच्या राज्यांमध्ये होणाऱ्या पाऊस आणि बर्फवृष्टीचे थेट परिणाम राज्यातील हवामानावरही होताना दिसणार आहेत.
सध्याच्या घडीला हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं उत्तर भारतातील अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे. तर, काही राज्यांमध्ये धुक्याची दाट चादर दृश्यमानता कमी करून अडचणी वाढवणार आहे. धुकं, पाऊस आणि शीतलहरी यामध्ये भरीस भर म्हणजे पर्वतीय राज्यांमध्ये हिमवृष्टीसही सुरुवात होणार आहे, तर कुठं सुरु असणारी हिमवृष्टी आणखी वाढणार असल्यामुळं उत्तरेकडील हे बदल राज्यावर आणि सबंध देशावर थेट परिणाम करताना दिसणार आहेत.
राज्यात नाशिकपासून जळगावपर्यंत आणि मुंबईपासून कोकणापर्यंत अनेक भागांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानात लक्षणीय घट होणार असून, ही घट येत्या काही दिवसांसाठी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. निफाडमध्येही तापमानाचा आकडा 9 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. तर, पुणे, सातारा, कोल्हापुरातील डोंगराळ भागामध्ये गार वारे थंडीची चाहूल देऊन जाण्याचाही अंदाज आहे. देश पातळीवर हिमाचलपासून उत्तराखंडपर्यंत पावसासह राजस्थानात गारपीटीचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोसाट्याचा वारा, धुकं आणि मधूनच होणारा पावसाचा मारा यामुळं पंजाब, हरियाणा, चंदीगढ भागांमध्येही हवामानात सातत्यानं काही बदल होताना दिसणार आहेत. 'स्कायमेट' (Skymet) या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पूर्वोत्तर भारतासह अंदमान निकोबार, केरळचा दक्षिण भाग आणि तामिळनाडूमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.