Weather Updates : देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पाऊस 'या' ठिकाणांची पाठ नाही सोडणार

Weather Updates : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारं हवामानाचं सातत्यानं बदलणारं चक्र आता त्याचा वेग मंदावताना दिसणार आहे. 

सायली पाटील | Updated: Jan 15, 2024, 07:01 AM IST
Weather Updates : देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पाऊस 'या' ठिकाणांची पाठ नाही सोडणार  title=
Maharashtra weather updates winter news cold wave may increase in state and northern india

Weather Updates : पावसाळी ढग, धुकं आणि त्यानंतर अधूनमधून जाणवणारी थंडी या सर्व बदलांना शह देत आता पुढील काही दिवसांसाठी राज्यात थंडी स्थिरावताना दिसणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. ज्यामुळं किमान तापमानात घट नोंदवली जाणार आहे. किमान तापमानाचा आकडा सरासरी 12 ते 14 अंशांच्या घरात राहणार असून, डोंगराळ परिसरामध्ये हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईवर मात्र या थंडीची अद्यापही कृपा होण्याची चिन्हं नाहीत ही बाबही तितकीच स्पष्ट. 

हवामान विभागाचा एकंदर अंदाजा पाहता आता पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यानजीक असणाऱ्या पावसाच्या ढगांनी काढता पाय घेतला असून, हवामानातील आर्द्रताही कमी झाली आहे. सध्या बहुतांश राज्यात हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे. 

धुकं, पाऊस आणि कडाक्याची थंडी... देशातील हवामानाची काय स्थिती? 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सध्या श्रीलंका आणि नजीकच्या भागांमध्ये चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भरीस 16 जानेवारीला एक पश्चिमी झंझावात नव्यानं सक्रीय होणार आहे. परिणामस्वरुप अंदमान- निकोबार बेट समूहावर मध्यम पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळामध्येही पावसाची हजेरी राहणार असून, या भागांतून पाऊस काही काढता पाय घेताना दिसत नाहीये. 

हेसुद्धा वाचा : '...म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली', शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र

 

दरम्यान देशाची दक्षिण किनारपट्टी वगळता उर्वरित भागामध्ये हवामान  कोरडं राहणार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट तीव्रता वाढवताना दिसणार असून, यामुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. तर, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि बिहार या भागांवर दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार असून, इथं दृश्यमानता कमी राहील. ज्यामुळं वाहतुकीवर थेट परिणाम होणार आहेत. जम्मू काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या काही दिवसांत सातत्यानं थंडीचा कहर वाढताना दिसणार आहे.