दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ताकद देणार - शरद पवार

 दिल्लीत शेतकरी आंदोलनाला (Farmers Agitating In Delhi ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे.  

Updated: Jan 22, 2021, 11:56 AM IST
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ताकद देणार - शरद पवार

कोल्हापूर : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला (Farmers Agitating In Delhi ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला (Farmers Protest) महाराष्ट्रातून (Maharashtra) ताकद दिली जाईल, असे जाहीर केले आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे प्रकरणातील सखोल चौकशीची मागणी योग्य होती, असेही ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीत केंद्रीय कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे, त्याला ताकद देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व समविचारी पक्ष आणि नेत्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  नेतृत्वाखाली बैठक घेऊन आंदोलनास पाठिंबा देण्यात येईल, असे शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले. पवार यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. याबाबत केंद्राने समिती नेमली असली तरी ज्यांचा केंद्राच्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे नेते या समितीत आहेत. त्यामुळे 
शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे. तसेच केंद्र सरकारचा नव्याने दिलेला प्रस्तावही फेटाळण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी देशभरातील लोकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू आहे. राज्यातही याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. ज्यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे, त्या सर्व घटकांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसोबत असल्याचे जाहीर करण्यात येईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण मिळावे ही राज्य सरकारची भूमिका आहे, त्याच दिशेने सरकारची पावले पडत आहेत. खोटे आरोप करून राज्य सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र चालले आहेत. मात्र, हे महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे नक्की टिकेल. खोट्या आरोपांचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे पवार म्हणाले.

 पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

- जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली त्यात काही गैर नाही, मला देखील उद्या मुख्यमंत्री व्हावं वाटतं, असे ते म्हणाले
- शेती कायदा विषयक बनवलेल्या समितीवर शेतकऱ्यांना विश्वास नाही
- धनंजय मुंडे यांच्याबाबत जी चर्चा केली होती त्यावेळी आम्हला वाटलं होतं यात सत्यता पाहणे गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही हा निष्कर्ष काढला होता तो बरोबर होता हे आता दिसत आहे.पोलीस याबाबत तपास करत आहे, त्यांना त्यांचा तपास करू द्या

- सीरम ही जगमान्य संस्था आहे. आग लागली ती घटना चिंताजनक, मात्र ती आग लस बनवली जातेय त्यापासून 5 किमी लांब आहे
- सीरम मधल्या कर्मचाऱ्यांबाबत आम्हाला विश्वास आहे, हा एक अपघात आहे

- मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिल्यावर राज्यपाल यांनी कधी फेटाळला नाही, इथं मात्र दुसरंच काहीतरी दिसते
- कायदा आणि सुव्यवथा राज्याचा विषय आहे, त्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही इथं केंद्र हस्तक्षेप करत आहे हे आश्चर्यकारक
- ज्यांना सुरक्षा पोहचवली आहे त्यांनी मागणी केली असेल, किमान त्यांना चांगली झोप लागेल
- काही लोकांना ते चांगलं वाटतं, आतापर्यंत केंद्राने कधी सुरक्षा पोहोचवली नाही
- सुशीलकुमार शिंदे यांना आमच्या शूभेच्छा आहेत, ते आमचे सहकारी आहेत
- उसापासून थेट इथेनॉल बनवणे, साखर आणि इथेनॉलचे केंद्राने दर वाढवणे गरजेचं आहे
- केंद्राने उसाची किंमत ठरवली हे चांगलं आहे पण साखरेचा दर निश्चित केला नाही
- पुढच्या आठवड्यात याबाबत दिल्लीत जाऊन चर्चा करणार आहोत