Maharastra Politics : दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलेली मुदत 25 नोव्हेंबरला संपली. या मुदतीत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात मनसे (MNS) आक्रमक झालीय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि मॉलच्या विरोधात मनसेनं खळ्खट्याक सुरू केलंय. सोमवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
केवळ मुंबई-ठाणे नाही तर सोलापुरातही मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नवी पेठ व्यापारी परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांवर काळं फासलं. काही पाट्यांची तोडफोड केली. यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय. तर दुसरीकडं मराठी पाट्यांच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटही (Shivsena Thackraey Group) रस्त्यावर उतरलाय. शिवडीत आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. मराठी पाट्यांचा कायदा उद्धव ठाकरेंनी केला, त्यामुळं त्याचे श्रेय आमचंच असल्याचा दावा चौधरींनी केला.
मराठी पाट्यांच्या श्रेयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात चढाओढ सुरू झाली आहे. मराठीचा कैवार घेऊन राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळ्ळ-खट्याक करतेय. तर आम्हीही मागे नाही, हे दाखवण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा खटाटोप आहे. मराठी पाट्यांच्या श्रेयवादाच्या लढाईतून आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेरीज केली जातेय, हे उघड आहे.
आणखी वाचा - मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!
दरम्यान, मुंबईत सुमारे 7 लाख दुकानं आस्थापनं आहेत. त्यापैकी केवळ 28 हजार दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याची आकडेवारी मुंबई महापालिकेनं दिलीय. विशेष म्हणजे दुकानदारांना पाट्या लावण्यासाठी तब्बल तीनवेळा मुदतवाढ देण्यात आलीय. तरीही पाट्या न लावणा-या दुकानांवर मुंबई महापालिका सोमवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करणार आहे. प्रति कर्मचारी 2 हजार रुपये या हिशेबानं दंडआकारणी केली जाणारेय.