सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात दहशतवादी (Terrorist) अटक प्रकरणात नवनवे खुलासे होतायत. एनआयएने (ANI) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून एनआयएने डॉ. अदनानी सरकार या व्यक्तीला अटक केली आहे. डॉ. अदनानीच्या कोंढव्यातल्या घरातील झडतीदरम्यान एनआयएला इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तऐवज यांसारखी अनेक अपराधी सामग्री आढळून आली आहे. तरुणांची माथी भडकाऊन त्यांना आयसिसमध्ये भरती करण्याची जबाबादारी डॉ. अदनानीवर होती. या तरुणांचा वापर हिंसक कारवाया करण्यासाठी केला जात असल्याचा खुलासा त्याच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांवरुन झाला आहे.
आरोपींनी इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS), Daish/Islamic State in Khorasan या सारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्या ISIS च्या दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी कट रचला होता. एनआयएने केलेल्या दाव्यानुसार देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा डॉ. अदनानी प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. तसंच भारत सरकारच्याविरोधात युद्ध पुकारण्याचाही अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा कट होता.
गेल्या आठवडाभरात पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे इथं केलेल्या कारवाईत 3 जुलै 2023 रोजी NIA ने चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख @ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहे. ISIS च्या कटाची संपूर्ण रूपरेषा उलगडण्यासाठी एजन्सी महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणाची चौकशी करणार आहे.
पुणे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट
पुणे पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांच्या गस्ती दरम्यान बाईकचोरी करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली होती. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस महम्मद अशी त्यांची नावं असून हे दोघे पुण्यात बॉम्बस्फोट घडवार असल्याचं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनी मिळून सातारा पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे. 18 जुलै रोजी या दोन्ही दहशतवाद्यांना पुण्यातील कोथरूड पोलिसांनी अटक केली होती.