विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड: राज्यातील राजकारणाचा संपूर्ण दिवस आज एकनाथ शिंदे यांच्या भोवती फिरत राहिला. एकनाथ शिंदे यांनी बंडांचं निशाण फडकवल्यानंतर आता पुढे काय होणार? याची उत्सुकता राजकीय जाणकारांना लागून आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तरणार की पडणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं तर राज्यात भाजपाचं सरकार येईल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल, असं सांगण्यात येत आहे. सध्या जर तरचं राजकारण सुरु असताना भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चुरस सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बीडमधील आष्टी येथील भाजपा कार्यकर्त्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर 'पंकजाताई भावी मुख्यमंत्री', 'पंकजाताईंना मुख्यमंत्री करा', अशा घोषणा दिल्या. त्यावेळी पंकजा मुंडे खळखळून हसल्या. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते, असे म्हणत त्यांनी भाषणातून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रिपदावरून प्रतिउत्तर दिले.
एकीकडे गुजरातच्या सुरत मध्ये महाराष्ट्र सरकार बदलासाठी जोरदार हालचाली सुरू असताना बीड मध्ये मात्र भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा मुंडे ह्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्या असा सुरू निघाल्याने देवेंद्र फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे यांचा संघर्ष पुन्हा एकदा समोर येतो का? हाच मोठा प्रश्न आहे.