कोल्हापूर : मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला शिव्या देवून काँग्रेस पक्ष संपणार नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी काँग्रेसला कितीही शिव्या दिल्या तरी काँग्रेस संपणार नाही. हिंदूचा मक्ता फक्त भाजपनेच घेतलाय, असे दाखवले जात आहे. आम्ही देखील हिंदू आहोत. पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच आहोत आणि आम्हालाच देशद्रोही म्हटले जात आहे. हे कितपत योग्य, असा सवाल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी, खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला आहे.
खरगे म्हणालेत, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गरिबांचे आरक्षण रद्द करण्याचा डाव आहे. दुसरीकडे उच्च वर्णियांना दहा टक्के आरक्षण मिळावे, यासाठी संसदेत निर्णय घेतला जातो. ही विसंगती देशासाठी धोकादायक आहे. तर पाकिस्तानला पराभूत करण्याचं काम काँग्रेसच्याही काळात झाले. पण त्याचे श्रेय लाटण्याचे काम आम्ही केलेले नाही, असे सांगत काँग्रेस नेत्यांच्या घामामुळेच महाराष्ट्र घडला आहे, हे भाजपने लक्षात ठेवावे, असे ते म्हणालेत.
त्याचवेळी विधानसभेचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही टीका केली. सीएमनी आरशासमोर उभे राहावे, विरोधी पक्षनेता दिसेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि भाजपवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल थोरात यांनी केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी निश्चित झाली आहे. अन्य घटक पक्षांसोबतही चर्चा सुरु आहे. स्वाभिमानी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीही आमच्यासोबत असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
जे पक्ष सोडून पळाले ते फसले आहेत. भाजप सरकार अनेक घोषणा करत आहे. पण विचार केला तर त्यांनी केलेली कोणतीच घोषणा पूर्ण केलेली नाही. भाजपाने सत्ता मिळविण्याचे मशीन बनवलं आहे, अशी भाजपवर टीका केली. त्याचवेळी शिवसेनेलाही चिमटा काढला. मध्यंतरी शिवसेनेने पीक विम्यासाठी मुंबईमधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये मोर्चा काढला. मुळात तिथे पीक विम्याच ऑफिसच नव्हतं. तरीदेखील त्याठिकाणी मोर्चा काढण्यात आला, असे ते म्हणालेत.