मुंबई : महाराष्ट्र दहशतवात विरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत पुण्यातील चाकण येथून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी २ डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली.
#Maharashtra ATS: One person arrested by Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) from Pune's Chakan on 2 Dec for allegedly carrying weapons. During probe, it was revealed that he was actively involved in Khalistan movement&was in contact with Khalistani activists of Pakistan&India
— ANI (@ANI) December 11, 2018
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती खलिस्तान चळवळीशी जोडला गेला असून, पाकिस्तान आणि भारतातील खलिस्तानी आंदोलकांशी तो संपर्कात असल्याची बाबही उघडकीस आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
हरपाल सिंग नाईक (४२) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून, तो मुळचा पंजाब येथील रोपार जिल्ह्यात राहणारा आहे. तो ट्रेलरचा चालक असल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलं आहे. एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये त्याच्या कडून फक्त शस्त्रसाठाच नव्हे तर, एका कॉर्पोरेट कंपनीचं ओळखपत्र, निनावी धनादेश, एटीएम कार्ड आणि बँक खात्याची काही महितीही जप्त करण्यात आली होती. तपासादरम्यान पथकाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार नाईक हा खलिस्तानचा समर्थक असून, शीख राष्ट्र स्थापनेला त्याचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं.
एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी त्याला एटीएस अधिकारी कैलास पिंगळे यांनी न्यायालयासमोर सादर केलं. ज्यानंतर १७ डिसेंबरपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय न्यालयाकडून देण्यात आला.