ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात

ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.  

Surendra Gangan Updated: Mar 15, 2018, 10:43 PM IST
ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात title=

रत्नागिरी : ढगाळ वातावरण आणि कालपासून काही ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं प्रशासनानं सतर्कतेचा, सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा दिलाय. 

कोकणातल्या आंबा बागायतदारांचे मागे निसर्गाचं शुक्लकाष्ठ लागलंय. गेल्या चार वर्षात अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे आंबा उत्पादक शेतकरी पुरता हैराण झालाय. बुधवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा ढगाळ वातावरण आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यात पावसानं काल हजेरी लावली. काही ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळं आंबा बागायतदारांच्या तोंडचं पाणी पळालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जातेय.

ढगाळ वातावरणाचा परिणाम पुढले ३ ते ४ दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे पिकांवर विषेशतः कोकणात आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, शेतक-यांनी कृषी विद्यापीठानं सूचना केल्यानुसार औषधांची फवारणी करण्याचं आवाहन रायगड जिल्हा कृषी अधिका-यांनी केलं आहे.

किनारपट्टीवर कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात न जाण्याचा इशारा सिंधुदुर्ग जल्हा प्रशासनाकडून मच्छीमारांना देण्यात आलाय. काल रिमझिम पाऊस झाल्यानंतर आजही पाऊस पडेल अशी स्थिती आहे .वादळी वारेही पाहायला मिळत आहेत.