"राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की...", मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले!

Manoj jarange Interview : झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Sep 8, 2023, 05:09 PM IST
"राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की...", मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले! title=
Manoj jarange, maratha reservation

ZEE 24 TAAS Interview :  गेल्या 10 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारने काढलेला जीआर जरांगे यांनी फेटाळून लावला. जीआरमध्ये काही सुधारणा करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यासाठी शिष्टमंडळ देखील पाठवण्यात येणार आहे. जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय. अशातच झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे?

महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी आमची मागणी आहे. आमच्याकडे वंशावळी नाहीये . त्यामुळे आम्ही जीआर स्विकारला नाही. आमचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहे. आम्ही पूर्वीपासून कुणबीच आहोत. निझामकालीन कुबणीच्या नोंजी नाहीत. सरकारचा जीआर आम्हाला मान्य नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मराठ्यांची पोटजात कुणबी आहे. मराठ्यांची कुणबी पोटजात होऊ शकत नाही का? मराठा हा सरसकट कुणबी आहे. ओबीसीमध्ये जाण्यासाठी मराठा समाज राहिला किती? खानदेश, विदर्भ काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग, काही कोकणाचा भाग हा ओबीसीमध्ये गेला आहे. मराठवाडा आणि काही उर्वरित भाग ओबीसीमध्ये नाही. त्यामुळे आम्ही सरसकट हा शब्द उच्चारला आहे, असं जरांगे म्हणाले आहेत.

आम्ही गरीब मराठ्यांसाठील लढतोय. जीआरमध्ये सुधारणा व्हावी, अशी आमची मागणी आहे. सर्वांचं भलं होवो, मात्र आमच्या मुलाबाळांचं देखील भलं होऊदे.., आम्हाला कोणाचं नुकसान करायचं नाही. आम्ही गेल्या 5 वर्षापासून आंदोलन करतोय. सरकारने योग्य ती पाऊलं उचलावं, असं मनोज जरांगे म्हणाले.

आंदोलनला राजकीय पाठबळ?

राजकारण्यांचा धंदाच त्यो हाय, कुणी खुटी मारली की झालं सुरू... आम्ही 123 गावांचं पोरांनी हे धाडस केलंय. आमच्या आंदोलनला राजकीय पाठबळ आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही आमच्या हिंमतीवर आंदोलन उभा केलंय. आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार. आम्हाला कोणत्याही नेत्याचा पाठिंबा नाही, असं स्पष्टपणे जरांगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्याकडे कोणी 96 कुळी, 92 कुळी मराठा आहेत, त्यांना ओबीसीमध्ये जायचं नाही. त्यांनी खुशाल आरक्षणाबाहेर रहा, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. ओबीसी आणि आम्ही एकमेकांचे भाऊ आहे, त्यामुळे आपण एकमेकांना मदत करत राहू, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. आपल्याला मनाचं परिवर्तन करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे, असं जरांगे म्हणाले आहेत.