कल्याणमधील धक्कादायक प्रकार, कोरोना काळात रुग्णांची गुरांप्रमाणे वाहतूक

एकाच रुग्णवाहिकेतून अनेक रुग्णांची वाहतूक

Updated: Jul 2, 2020, 06:18 PM IST
कल्याणमधील धक्कादायक प्रकार, कोरोना काळात रुग्णांची गुरांप्रमाणे वाहतूक title=

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना अनेक सूचना करण्यात येत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्स पाळण्यावर विशेष भर देण्यात येतो आहे. सरकारी बस, ट्रेन मध्ये देखील एका सीटवर एक प्रवासी, खाजगी वाहनांना देखील प्रवासी संख्येची मर्यादा घालून दिलेली आहे. असे असतांना, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना टाटा आमंत्रा याठिकाणी नेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत आहे.

कल्याण शहरातील कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेत घेऊन येत असताना ही रुग्णवाहिका कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा याठिकाणी आली. येथे एकाच घरातील दोन महिला रुग्ण रुग्णवाहिकेची वाट बघत होत्या. यावेळी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडताच ही रुग्णवाहिका आधीच भरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तरी देखील या दोन रुग्णांना याच रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. अशाप्रकारे एकाच रुग्णवाहिकेत 8 ते 10 रुग्ण कोंबल्याने रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली असून याला जवाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंता वाढल्या आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.