'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं

Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: आज राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरु असल्याने या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2024, 10:03 AM IST
'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं title=
पत्रकारांशी बोलताना जरांगे-पाटलांनी दिली माहिती

Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार आज राज्यभरामध्ये रास्तारोको आंदोलन केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेत आंदोलनाच्या स्वरुपात बदल करण्यात आल्याची माहिती जरांगे-पाटलांनी दिली आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी हे रास्तारोको आंदोलन केवळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केलं जाणार असल्याचं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. दुपारी 1 नंतर या आंदोलनाचं रुपांतर धरणे आंदोलनात करावं, असं आवाहन जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत लागली तर स्वत: तुम्ही त्यांना परीक्षाकेेंद्रावर सोडून या असंही जरांगेंनी आंदोलकांना सांगितलं आहे.

स्वत: विद्यार्थ्यांना सोडून या

"11 ते 1 या वेळेत रास्तारोको करा. विद्यार्थ्यांना काय अडचणी आल्या तर त्यांना रस्ता द्या. स्वत: त्यांना नेऊन सोडा. 1 वाजल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर किंवा मंदिरासमोर या रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा. शहरातल्यांनी तहसीलसमोर किंवा कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करा," असं आवाहन जरांगे-पाटलांनी आंदोलकांना केलं आहे. सरकार आता रडीचा डाव खेळायला लागले आहेत. सरकार अस्तित्वात असूनही त्यांची परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद राहिलेली नाही, असा टोलाही जरांगे-पाटलांनी लगावला आहे.

आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर...

अचानक कसा काय बदल केला? असा प्रश्न जरांगे-पाटलांना विचारण्यात आला असता त्यांनी यामागील कारण देताना विद्यार्थ्यांचा आवर्जून उल्लेख केला. "आम्ही आंदोलनात एकच बदल केला आहे की रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करतोय. आमच्याकडे बंजारा बांधव, चर्मकार बांधवांनी आमची भेट घेतली आणि आम्हाला सहकार्य करण्याची मागणी केली. आम्ही भावनाशून्य नाही. आमच्यामुळे कोणाला त्रास नको. मराठा समाज शांततेमध्ये आंदोलन करणार आहे," असं जरांगे-पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "विद्यार्थ्यांमध्ये आंदोलनामध्ये भितीचं वातावरण आहे. परिक्षेला जाताना अडचण येईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे आपल्याला सामाजिक विचार करुन त्यांचं हित लक्षात घेतलं पाहिजे. त्या लेकरांना पेपर लिहायला अडचण येता कामा नये. आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला काय वाटेल? मग इतरांमध्ये आपलं लेकरु बघायला नको का? हा यामागील उद्देश आहे. 3 मार्चचा रस्तारोको फायनल आहे. आज दुपारनंतर रास्तारोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करणार आहे," अशी माहिती जरांगे-पाटलांनी दिली.

उद्या महत्त्वाची बैठक

"उद्या मला मराठा समाजाशी बोलायचं असून महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत," असं म्हणत जरांगे-पाटलांनी जास्तीत जास्त लोकांनी उद्याच्या बैठकीला यावं असं म्हटलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये रविवारी ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल असं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे. विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ओबीसीमधूनच टिकाणारे आरक्षण, सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाचा कायदा करुन अंलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी मागण्यांवर जरांगे ठाम असून यासाठीच सध्या आंदोलन सुरु आहे.